आगीच्या घटनेचा एपीएमसी प्रशासनाला विसर?

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात नोव्हेंबर-२०२२ मध्ये  कागदी पुठ्ठे आणि लाकडी खोक्यांना आग लागून २० ते २५ गाळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. मात्र, सदर घटना घडून देखील एपीएमसी फळ बाजार आवारात लाकडी पेट्या बनवणाऱ्यांनी अतिक्रमण करण्यास केली सुरुवात केली आहे. त्यामुळे नोव्हेंबर-२०२२ एपीएमसी फळ बाजारा त लागलेल्या आगीतून एपीएमसी प्रशासनाने कुठलाच  बोध घेतला नसल्याचे चित्र दिसत आहे.

हापूस आंब्याचा हंगाम सुरु होताच एपीएमसी फळ बाजार आवारात तसेच एपीएमसी फळ बाजार आवाराच्या आजूबाजूला लाकडी पेट्या बनवणाऱ्या  व्यावसायिकांचे पेव फुटते. एपीएमसी बाजार आवारात एपीएमसी प्रशासन तर बाजार आवाराबाहेर नवी मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे लाकडी पेट्या बनवणाऱ्या व्यावसायिकांना हात ओले करुन दरवर्षी संरक्षण देण्यात येते. लाकडी खोके आणि कागदी पुठ्ठ्यांच्या साठवणुकीमुळे  एपीएमसी फळ बाजारात १७ नोव्हेंबर २०२२ रोजी  भीषण  आग लागुन २० ते २५ गाळे आगीच्या भक्ष्यस्थानी गेले होते.त्यामुळे एपीएमसी बाजार आवारात आगीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, याकरिता एपीएमसी बाजार आवारातील अतिक्रमणे रोखण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने एक समिती गठीत केली होती. या समितीचा अहवाल एक वर्षानंतर एपीएमसी संचालक मंडळासमोर आला होता. या अहवालात अग्नी सुरक्षेबाबतीत अनेक ठपके ठेवण्यात आले होते. तर अग्निसुरक्षेत एपीएमसी बाजार समितीत अनेक त्रुटी असल्याबाबत नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलाने देखील एपीएमसी प्रशासनास पत्र लिहून वारंवार अवगत केले होते. मात्र, सदर सूचनांवर अंमलबजावणी करण्याऐवजी एपीएमसी प्रशासन अतिक्रमणाला खतपाणी घालत आले आहे. त्यामुळे एपीएमसी बाजार आवारात आगीच्या घटना घडत आहेत.

दुसरीकडे आता पुन्हा एकदा एपीएमसी फळ बाजार आवारात लाकडी पेट्या बनवणाऱ्यांनी अतिक्रमण करण्यास केली सुरुवात केली आहे. त्यामुळे एपीएमसी प्रशासन आणखी एका आगीच्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का?, असा सवाल या निमित्ताने एपीएमसी बाजार आवारातील घटकांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबतीत एपीएमसी फळ बाजार उप सचिव संध्या अढांगळे याच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद लाभला नाही. 

 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आवक कमी ; लिंबू महाग