मे महिन्यात १२०३ अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभाग द्वारे नवी मुंबई शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे यावर धडक कारवाई करण्यात येत असून, पावसाळापूर्व कालावधीत मे महिन्यामध्ये आठही महापालिका विभाग कार्यालय क्षेत्रातील अनधिकृत झोपड्यांवर तोडक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये प्राधान्याने डोंगर पायथ्याशी असलेल्या संभाव्य दरडप्रवण क्षेत्रातील झोपडया हटविण्यात आल्या आहेत.  

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, उपायुक्त (अतिक्रमण विभाग) डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली आठही महापालिका विभाग अधिकारी यांनी अतिक्रमित झोपडपट्टी हटाव मोहीम प्रभावीपणे राबविली असून, गेल्या मे महिन्यात १,२०३ इतक्या मोठया संख्येने अनधिकृत झोपडया हटविण्यात आल्या आहेत.

या कारवाईमध्ये बेलापूर विभागातील दुर्गानगर, पंचशिल नगर, बेलापूर उड्डाणपूलाखाली, बेलापूर सेवटर-२८ मधील वि्ील मंदिर लगत उभारण्यात आलेल्या एकूण २५१ अनधिकृत झोपडयांवर तोडक कारवाई करण्यात आली आहे. तसेच नेरुळ सेवटर-९ मधील पाणी टाकीच्या बाजूला, महात्मा गांधीनगर येथील बालाजी मंदिर लगत बांधण्यात आलेल्या ९० अनधिकृत झोपडया हटविण्यात आल्या आहेत. वाशी विभागामध्ये हायटेन्शन वायरखाली, मुंबई-पुणे मार्गालगत वाशी गाव टोलनाक्याच्या बाजूला उभारण्यात आलेल्या ८१८ बेकायदा झोपड्या निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

महापालिका अतिक्रमण विभाग तर्फे घणसोली मधील पामबीच मार्गालगत साईबाबा मंदिर जवळ उभारण्यात आलेल्या २७ अनधिकृत झोपडया तसेच ऐरोली मधील ठाणे-बेलापूर रस्त्यानजिक भारत बिजली कंपनी समोरील रेल्वे रुळांनजिक अनधिकृतरित्या वसलेल्या १५ झोपडयांवर तोडक कारवाई करण्यात आली आहे. दिघा विभागातील ईश्वरनगर आणि विष्णुनगर येथील २ अनधिकृत झोपडया निष्कासित करण्यात आल्या आहेत.

गेल्या मे महिन्यात पावसाळा पूर्व कालावधीत नवी मुंबई महापालिका क्षेत्रामधील विविध विभागांतील १,२०३ अनधिकृत झोपडयांवर तोडक कारवाई करण्यात आली असून, पावसाळी कालावधीत नैसर्गिक आपत्ती उद्‌भवल्यास दुर्घटना घडू नये म्हणून डोंगर पायथ्याशी असलेल्या दरड प्रवण क्षेत्रातील झोपडपट्टया हटविण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. - डॉ. राहुल गेठे, उपायुक्त (अतिक्रमण विभाग) - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 लोकल मधील गर्दीचा पुन्हा बळी