परदेशातील नोकरीसाठी गमावले ११ लाख

नवी मुंबई : परदेशातील कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने सायबर टोळीने वाशी, सेक्टर-१७ मध्ये राहणाऱ्या व्यक्तीला वेगवेगळ्या कारणासाठी पैसे भरण्यास सांगून त्यांच्याकडून तब्बल ११.१० लाख रुपये उकळून त्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाशी पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात सायबर टोळी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

या प्रकरणातील तक्रारदार अमित अवस्थी (५२) वाशी, सेक्टर-१७ मध्ये राहण्यास असून त्यांना इंटरनॅशनल नोकरीची गरज असल्याने त्यांनी विविध ठिकाणी अर्ज केले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये त्यांच्या मोबाईलवर मायकल जोसेफ नावाच्या सायबर चोरट्याने संपर्क साधून त्यांना सिंगापूर आणि इतर ठिकाणी जॉब मिळवून देण्याचा बहाणा करुन त्यांना ६१५० रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार अवस्थी यांनी ग्रॉस कॅरीअर.कॉम या वेबसाईटवर सदर रक्कम पाठवून दिल्यानंतर दुसऱ्या सायबर चोरटयाने अवस्थी यांना संपर्क साधून परदेशातील नोकरीचे त्यांचे पक्के झाल्याचे सांगितले.  

तसेच पुढील एक राऊंड बाकी असून त्यासाठी काही रक्कम भरावी लागेल असे सांगून सदर रक्कम रिफंडेबल असल्याचे सांगितले. सदर रक्कम परत मिळणार असल्याचे सायबर चोरट्याकडून सांगण्यात आल्याने अवस्थी यांनी सायबर चोरटे सांगतील त्यानुसार १२ ते १६ जानेवारी २०२४ या कालावधीत तब्बल ११.१० लाख रुपये पाठवून दिले. त्यानंतर अवस्थी यांना आणखी १.३० लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले. मात्र, अवस्थी यांनी सदर रक्कम भरु शकत नसल्याचे सांगून आपली रक्कम परत करण्यास सांगितले. त्यावर प्रोसेस असून त्याकरिता ३० दिवसाचा कालावधी लागले, असे या सायबर चोरट्यांनी सांगितले.  

त्यानंतर या सायबर चोरट्यांनी अवस्थी यांना अद्यापपर्यंत त्यांची रक्कम परत केली नाही. त्यामुळे अवस्थी यांनी अनेकवेळा वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनतर आपली फसवणूक झाल्याचे अवस्थी यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

वाहतुक नियमांच्या जनजागृतीसाठी कोपरखैरणे वाहतूक पोलिसांकडून नाविन्यपुर्ण उपक्रम