‘सिडको'च्या भूखंडावर अनधिकृतपणे डेब्रीज टाकण्याचा प्रयत्न

नवी मुंबई : ‘सिडको'ने संपादित केलेल्या जमिनीवर आणि भूखंडावर मानवी आरोग्यास धोकादायक तसेच पर्यावरणास हानिकारक असलेले डेब्रीज टाकणाऱ्या डंपर चालकांची ‘सिडको'कडून धरपकड सुरुच आहे. २३ मार्च रोजी दुपारी ‘सिडको'च्या पथकाने न्हावाशेवा-शिवडी अटल सेतू (एमटीएचएल रोड) वर शेलघर मार्गे उलवे, शेलघर, गव्हाण या परिसरात डेब्रीज टाकण्यासाठी आलेले आणखी ३ डंपर पकडले आहेत. गत आठवड्यामध्ये ‘सिडको'च्या पथकाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात डेब्रीज टाकण्यासाठी आलेल्या ५ डंपरसह चालकांची धरपकड केली होती.  

‘सिडको'ने संपादित केलेल्या भूखंडावर अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात डेब्रीज टाकण्यात येत असून सदर डेब्रीज मानवी आरोग्यास धोकादायक आणि पर्यावरणास हानीकारक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ‘सिडको'च्या भूखंडावर टाकण्यात येणाऱ्या अनधिकृत डेब्रीजला आळा घालण्याच्या दृष्टीने ‘सिडको'चे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली दक्षता तपास अधिकारी, सुरक्षा विभाग, अभियांत्रिकी विभाग आणि पोलीस पथकाने अनधिकृतपणे डेब्रीज टाकणाऱ्या डंपर चालकांविरोधात विशेष मोहिम सुरु करण्यात आली आहे.  

या विशेष मोहिमेदरम्यान ‘सिडको'च्या पथकाने गत आठवड्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात तसेच उलवे परिसरात ‘सिडको'च्या जमिनीवर डेब्रिज टाकण्यासाठी आलेल्या ५ डंपरसहित त्यावरील चालकांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात सीबीडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता. या कारवाईनंतर २३ मार्च रोजी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास न्हावाशेवा शिवडी अटल सेतू रोडवर शेलघर येथे मानवी आरोग्यास हानिकारक असलेल्यो डेब्रीजने भरलेले ३ डंपर पकडण्याची कारवाई ‘सिडको'च्या पथकाने केली आहे.    

सदर डंपरमधील मानवी आरोग्यास हानिकारक असलेले डेब्रीज विनापरवाना उलवे, शेलघर, गव्हाण परिसरात खाली करण्यासाठी नेले जात असल्याचे आढळून आल्यानंतर‘सिडको'च्या पथकाने तिन्ही डंपरसह त्यावरील चालक साईनाथ शिंदे, विशाल सुशीलकुमार आणि बबलू चौहान या तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर पथकाने त्यांच्या विरोधात न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  

सिडको कार्यक्षेत्रामध्ये अनधिकृतपणे डेब्रीज टाकत असताना कोणी आढळल्यास त्याबाबतची माहिती ‘सिडको'च्या www.cidco.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तसेच संबंधित पोलीस ठाण्यात कळविण्यात यावे, असे आवाहन ‘सिडको'तर्फे करण्यात येत आहे. - सुरेश मेंगडे, मुख्य दक्षता अधिकारी, सिडको. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ठेकेदाराच्या हलगर्जीपणा; लाखो लिटर पाण्याची नासाडी