नेरुळ मधील ‘वंडर्स पार्क'ला पर्यटकांची पसंती

वाशी : नवी मुंबई शहरातील नेरुळ मधील ‘वंडर्स पार्क' नुतनीकरणानंतर पर्यटक आणि बच्चे कंपनीच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. त्यामुळे ‘वंडर्स पार्क' मध्ये दररोज शेकडो पर्यटक भेट देऊन येथील खेळणी आणि झुळ्यांचा आनंद घेत असून, गेल्या एप्रिल महिन्यात या ‘वंडर्स पार्क' मध्ये १ लाख २ हजार ४९२ नागरिकांनी भेट दिली असून, त्यापोटी नवी मुंबई महापालिकेच्या तिजोरीत ९०  लाख ६१ हजार ५९५ रुपयांची भर पडली आहे.

नवी मुंबई शहर उद्यानांचे शहर म्हणून ओळखले जाते. नवी मुंबई शहराची उद्यानांचे शहर अशी ओळख असली तरी अलिकडील काळात नवी मुंबईकरांना नेरुळ मधील ‘वंडर्स पार्क'ची चांगलीच भुरळ पडली आहे. नवी मुंबई शहरातील उद्याने सोडली तर बच्चे कंपनीला पर्यटनासाठी अधिक जागा नसल्याने नागरिक बेलापूर येथील नवी मुंबई महापालिका मुख्यालय तसेच शॉपिंग मॉल यांना पसंती देत असत. मात्र, नेरुळ मध्ये महापालिकेने ‘वंडर्स पार्क' उभारल्यानंतर पर्यटकांची पाऊले या ‘पार्क'कडे वळू  लागली आहेत. त्यामुळे अल्पावधीतच नवी मुंबई शहरातील सर्वात भव्य उद्यान म्हणून नेरुळ मधील ‘वंडर्स पार्क'ची ओळख तयार झाली. कोरोना काळात ‘वंडर्स पार्क' नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. या दरम्यान पुन्हा एकदा २७ कोटी खर्च करुन ‘वंडर्स पार्क'च्या नूतनीकरणाचे काम करण्यात आले. ‘वंडर्स पार्क' मध्ये नवीन राईड, लेझर शो, खेळणी, ट्रॉय ट्रेन, मॅजिक शो बसविण्यात आले आहेत. त्यामुळे  दिवसागणिक या ठिकाणी पर्यटकांचा ओढा वाढत चालला आहे.

नेरुळ मधील ‘वंडर्स पार्क' मध्ये जून-२०२३ ते मार्च-२०२४ या दरम्यान ७ लाख २३ हजार ३३१ नागरिकांनी भेट दिली आहे. त्यापोटी ४ कोटी ४१ लाख रुपये इतकेउत्पन्न नवी मुंबई महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले आहे. तर एप्रिल-२०२४ मध्ये ‘वंडर्स पार्क'ला रेकॉर्ड ब्रेक अशी १ लाख २ हजार ३९२ पर्यटकांनी भेट दिली असून, त्यापोटी महापालिकेच्या तिजोरीत ९० लाख ६१ हजार  ५९५ रुपयांची भर पडली आहे. सध्या सुरु असलेला मे महिना आणि शाळेला पडलेली सुट्टी पाहता चालू मे महिन्यात सव्वालाख पेक्षा जास्त पर्यटक ‘वंडर्स पार्क'ला भेट देतील, असा अंदाज ‘वंडर्स पार्क' व्यवस्थापनाने वर्तवला आहे.

वंडर्स पार्क मध्ये बसवण्यात आलेली खेळणी, लेझर शो, राईड या बच्चे कंपनीसाठी आकर्षण बनत आहेत.तसेच एखाद्या ‘भव्य पार्क' मधील सुविधा स्वतः च्या नवी मुंबई शहरात स्वस्त दरात भेटत असल्याने नागरिकांचा वेळ आणि पैसा या दोन्हींची बचत होत असल्याने ‘वंडर्स पार्क'ला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. - चंद्रकांत तायडे, उपायुक्त - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोपरखैरणे येथे दि.बा.मोकाशी यांच्या कथेचा नाट्यरुपी कलाविष्कार सादर