दिघा-ऐरोली विभागात ‘विकसित भारत संकल्प यात्रा' संपन्न

‘संकल्प यात्रा'ला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

नवी मुंबई : २७ डिसेंबर पासून नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ‘विकसित भारत संकल्प यात्रा'ला सुरुवात झाली असून दिघा येथे संपन्न झालेल्या यात्रेच्या शुभारंभप्रसंगी १ हजाराहून अधिक नागरिकांनी सहभागी होत उत्साही प्रतिसाद दिला. यावेळी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केलेल्या आवाहनास अनुसरुन दिघा विभाग कार्यालयाजवळील दुपारच्या दुसऱ्या सत्रातही परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती जाणून घेतली. तसेच काही नागरिकांनी अर्ज भरले व योजनांचा लाभही घेतला.

२८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १ या वेळेत यादवनगर, ऐरोली येथे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या उपस्थितीत नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ‘विकसित भारत संकल्प यात्रा'च्या दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र १,१८० नागरिकांच्या मोठया संख्येने उपस्थितीत उत्साहाने संपन्न झाले. ऐरोली विभागाचे विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त अशोक अहिरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या नियोजनबध्द व्यवस्थेमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी जमूनही यात्रेचा कार्यक्रम अत्यंत व्यवस्थित रितीने पार पडला. यावेळी माजी नगरसेवक रामआशिष यादव आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा'मध्ये एलईडी व्हॅन द्वारे पंतप्रधान मोदी यांचा संदेश प्रसारित केला जात असून केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली जात आहे. याशिवाय यात्रा ठिकाणी केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती देणारे, अर्ज नोंदणी करणारे स्टॉल लावण्यात आले असून नागरिक या स्टॉलला भेटी देऊन योजनांची माहिती जाणून घेत आहेत. तसेच अर्जही दाखल करुन घेतले जात आहेत.

दरम्यान, आज २९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १ या वेळेत ही यात्रा इच्छापूर्ती गणेश मंदिर, सेवटर-१५, ऐरोली येथे तसेच दुपारच्या दुसऱ्या सत्रात दुपारी ३ ते ६ या वेळेत ॲपल हॉस्पिटल जवळ, सेवटर-८ ए, ऐरोली येथे आयोजित केली जाणार आहे. यामध्ये नागरिकांना योजनांची माहिती आणि त्याचे लाभ उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यानुसार नागरिकांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या तसेच नवी मुंबई महापालिकेच्या योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी, त्याचा लाभ घेण्यासाठी यात्रा स्थळांवर आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर-तळोजा खाडीवरील नवीन उड्डाणपुल