ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
माझी वसुंधरा अंतर्गत आठ महाविद्यालयांशी महापालिकेचा सामंजस्य करार
पनवेल : माझी वसुंधरा अंतर्गत पर्यावरण विषयक विविध कार्यक्रम राबविण्यासाठी आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनूसार महापालिका कार्यक्षेत्रातील आठ महाविद्यालयांशी महापालिकेने आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये झालेल्या कार्यक्रमांतर्गत नुकताच सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारामुळे माझी वसुंधरांतर्गत राबविण्यात येणारे पर्यावरण विषयक जनजागृतीचे कार्यक्रम नागरिकांपर्यंत पोहचिविणे शक्य होणार आहे.
पर्यावरण विभाग उपायुक्त डॉ. वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण, आठ महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पनवेल महानगरपालिकेच्यावतीने माझी वसुंधरा अंतर्गत नागरिकांमध्ये पर्यावरणाचा आदर वाढविणे , नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयक प्रश्नांबद्दल जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रम राबविण्यात येत असतात. विद्यार्थी हे भविष्यातील नागरिक असतात हे लक्षात घेऊन पर्यावरणीय साक्षरतेला प्रोत्साहन देण्याच्या कामामध्ये त्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने हा सामंजस्य करार महत्वचा ठरणार आहे.पर्यावरण संवर्धन आणि जागरुकता, हवामान बदल साक्षरता, पर्यावरण शिक्षण इत्यादी क्षेत्रात महापालिका करत असलेल्या कामामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने महापालिकेने पालिका कार्यक्षेत्रातील आठ महाविद्यालयाशी सामंजस्य करार केला आहे.
या सामंजस्य करारामुळे पनवेल महानगरपालिकेस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून पर्यावरणविषयक जनजागृतीचे विविध कार्यक्रम राबविणे सोपे जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने इको फ्रेंडली जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी सेमिनार आणि कार्यशाळा आयोजित करणे, शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या पर्यावरण संवर्धनाविषयी विविध अभ्यासक्रम शिकण्याच्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणे, ऊर्जा संवर्धन, मृदा संवर्धन, जलसंधारण इ. यांसारख्या विषयांवरती काम करण्यासाठी महापालिकेस सहकार्य करणे अशा विविध बाबींचा समावेश या सामंजस्य कराराअंतर्गत करण्यात आला आहे. या कारारामुळे महापालिकेस पर्यावरणीय समस्यांबद्दल जागरूकता आणि पर्यावरणीय साक्षरतेला प्रोत्साहन देणे सोपे जाणर आहे.
तसेच यावेळी माझी वसुंधरा अंतर्गत शाळा व महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमामध्ये सहकार्य करणाऱ्या एनएसएस विद्यार्थ्यांना आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यावरण विभाग उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी केले.
महापालिकेच्यावतीने सामंजस्य करार करण्यात आलेली महाविद्यालये
1. पिल्लई कॉलेज ऑफ आर्ट्स ,कॉमर्स ॲण्ड सायन्स
2. चांगू काना ठाकूर आर्ट्स ,कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज
3. पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरींग
4. सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरींग
5. आयटीएम आयएचएस कॉलेज ऑफ नर्सिंग
6. आयटीएम स्कील्स् युनिव्हर्सिटी
7. रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय खारघर
8. श्री. बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन