आरटीई प्रवेश अर्ज स्वीकारण्यास ४ जून पर्यंत मुदतवाढ

तुर्भे : राज्य शालेय शिक्षण विभागातर्फे आरटीई  कायद्याअंतर्गत आरटीई  प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून, आरटीई प्रवेश प्रक्रीया २०२४-२५ करिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्याच्या मुदतीमध्ये ४ जून २०२४ पर्यंत वाढ करण्यात आली आहे. या तारखेनंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही, याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी, असे राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य शासनाकडून २०२४-२५ या वर्षासाठी बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल आणि वंचित घटकांतील बालकांना सर्व खाजगी शाळांमध्ये (अल्पसंख्यांक शाळा वगळता) मोफत शिक्षण उपलब्ध करुन दिले जाते. यामध्ये प्रवेश पात्र वर्गाच्या एकूण पटसंख्येच्या २५ टक्के मुलांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. आरटीई प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पदधतीने राबवण्यात येत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुधारित आरटीई प्रवेश प्रक्रिया नव्याने सुरु करण्यात आली आहे. प्रथम १७  ते ३१ मे २०२४ दरम्यान आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली होती.

मुळातच उशिरा सुरु झालेली आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली होती. नवीन पद्धतीने घेण्यात येत असलेली यंदाची प्रवेश प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाने रद्द करून जुन्या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात यावी, असे आदेश दिले होते. त्यानंतर केवळ १५ दिवसांचा कालावधी प्रवेश प्रक्रियेसाठी देण्यात आल्याने पालकांमध्ये नाराजी होती.

पालकांना आपल्या पाल्याचा आरटीई  प्रवेशाचा अर्ज भरण्यासाठी ३१ मे २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, अजूनही काही कारणास्तव असंख्य पालक आरटीई प्रवेशाचा अर्ज भरु शकले नाहीत. दरवर्षी सुमारे ३ लाख पालक आपल्या पाल्याचा आरटीई प्रवेशाचा अर्ज भरतात. राज्यातील पालकांनी ३१ मे रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत २ लाख २४ हजार ६७१ विद्यार्थ्याचे आरटीई प्रवेशाचे ऑनलाईन अर्ज भरले आहते. राज्यातील ९ हजार २०७ शाळांमधील आरटीई प्रवेशाच्या १ लाख ५ हजार ११६ जागांसाठी ऑनालाईन अर्ज स्वीकारले जात आहेत.

आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी काही पालकांकडून केली जात होती. या मागणीची दखल घेऊन शासनाने आता आरटीई प्रवेशासाठी मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही कारणास्तव आपल्या पाल्याचा आरटीई प्रवेशाचा अर्ज भरु न शकलेल्या पालकांना आता त्यांच्या पाल्याचा आरटीई प्रवेशाचा अर्ज ४ जून २०२४ पर्यंत भरता येणार आहे.

 जागा कमी आणि आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज जास्त, अशी परिस्थिती निर्माण झाल्यास आरटीई प्रवेशासाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. लॉटरी मध्ये यशस्वी झालेल्या पालकांनी  पाल्यांच्या मूळ कागदपत्रांची शिक्षण विभागाकडून तपासणी केल्यावर संबंधित शाळेमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश