ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
निवडणुकीचे बिगुल वाजताच नवी मुंबई शहर ‘बॅनर'मुक्त?
वाशी : १९ एप्रिल ते १ जून २०२४ दरम्याने होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे (निवडणूक-२०२४ ) १६ मार्च रोजी वाजल्याने आचार संहिता सुरु झाली आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका प्रशासनाने नवी मुंबई शहरातील अनधिकृत बॅनर हटवण्यास सुरुवात केल्याने नवी मुंबई शहर ‘अवैध बॅनर'मुक्त झाले आहे.
नवी मुंबई शहरात काही बॅनरबाज अवैध बॅनर लावून नवी मुंबई शहर विद्रुप करत स्वच्छतेत बाधा आणत असतात. बेकायदा बॅनरबाजांवर कारवाई करावी, याकरिता महापालिका आयुक्त दरवर्षी आदेश देऊन विभागवार तक्रार क्रमांक प्रसिध्द करत असतात. मात्र, यातील बहुतांश बॅनर राजकीय नेत्यांचे असल्याने महापालिका कर्मचारी राजकीय नेत्यांचे अवैध बॅनर काढण्यास धजावत नाहीत. त्यामुळे अवैध बॅनरबाजांवर कारवाई होत असल्याचे चित्र दिसत नाही. मात्र, आता लोकसभा-२०२४ सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाली असून, राज्यात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. नवी मुंबई शहर ठाणे लोकसभा क्षेत्रात मोडत असून, ठाणे लोकसभा मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागताच अवैध बॅनरवर कारवाई करण्याचा सपाटा नवी मुंबई महापालिका प्रशासनाने लावला आहे. अवैध बॅनर, होर्डिंग, पलेवस काढण्याच्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या कारवाईमुळे नवी मुंबई शहरातील चौकांनी मात्र मोकळा श्वास घेतला आहे.