नालेसफाई की हाथ की सफाई
‘मनसेे'चा आंदोलनाचा इशारा
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील नालेसफाईचा कामांना सुरुवात झालेली आहे. मापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नालेसफाईची पाहाणीही केली. ३१ मे पर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण होतील, असा विश्वासही आयुवत राव यांनी व्यक्त केला. मात्र, प्रत्यक्षात मुदत संपत आल्यानंतरही आयुक्तांनी पाहणी न केलेल्या परिसरात नालेसफाई झालेली नसल्याची बाब समोर आली आहे. शहरातील काही नाल्यांमध्ये गाळ तसाच पडून आहे.
दरम्यान, ‘ठाणे'मधील गांधीनगर, कापूरबावडी, नलपाडा, लोकउपवन, घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वागळे इस्टेट येथील अनेक नाल्यांमध्ये कचऱ्यांचा ढीग साचलेलाच दिसून येत असून ठेकेदाराने नालेसफाई त्वरित न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ‘मनसेे'चे स्वप्नील महिंद्रकर यांनी दिला आहे.
ठाणे महापालिका हद्दीत सुमारे ३०८ कि.मी. अंतराचे १२९ छोटे-मोठे नाले आहेत. ठाणे शहरातील नालेसफाई व्यवस्थितरित्या व्हावी, यासाठी तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी निविदा प्रक्रियेमध्ये नाल्यांच्या सफाई संदर्भात काही अटी-शर्ती लागू केल्या होत्या. पण, ठेकेदारांनी संगनमत करुन सदर अटी-शर्ती हटवण्यास महापालिका प्रशासनाला भाग पाडले. असे करुन देखील ‘ठाणे'मधील नाल्यांची सफाईची परिस्थिती बघितल्यास बहुतेक नाल्यांमध्ये कचरा तसाच असून ठेकेदार फक्त ‘हाथ की सफाई' करत असल्याचा स्वप्नील महिंद्रकर यांनी आरोप केला आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची सफाई करण्यात येते. तसेच वर्षभर सदर नाले साफ ठेवण्याचे काम घनकचरा विभागाच्या माध्यमातून करण्यात येते. मात्र, पावसाळ्यापूर्वी घनकचरा विभागामार्फत नाल्यांची काटेकोर सफाई केली जात नसल्यामुळे पावसाळ्यात पाणी साठून ते रहिवासी वस्तीत घरांमध्ये शिरते. याचा नाहक त्रास ठाणेकरांना सहन करावा लागत असून नालेसफाई करताना त्यात जलवाहिन्या, वीज वाहिन्या येतात. त्यामुळे संबंधित सर्व विभागांनी समन्वय साधून काम करणे आवश्यक असूनही ते होत नसल्याचे वास्तव आहे.
‘ठाणे'मधील नाले साफसफाई म्हणजे केवळ ‘हाथ की सफाई' असल्याचे वारंवार निदर्शनास येऊन देखील राजकीय वरदस्तामुळे दरवर्षी कुठलीही कारवाई ठेकेदारांवर केली जात नाही. त्यामुळे ठेकेदार सुध्दा बिंंदिक्तपणे सफाई कामात हलगर्जीपणा करत असल्याचे दिसून येत आहे.
‘ठाणे'मधील कचऱ्याच्या समस्येमुळे रोगराईचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. नालेसफाईचे काम व्यवस्थितरित्या होण्याच्या अनुषंगाने प्रभाग समितीनिहाय नालेसफाईचे काम करण्यात येऊन सुध्दा ‘ठाणे'मधील नाल्यांची परिस्थिती आजतागायत सुधारलेली नाही. दरवर्षी करोडो रुपये नालेसफाईच्या नावावर मंजूर केले जातात. मात्र, अधिकारी आणि ठेकेदार संगनमत करुन काम न करताच कामांची बिले काढण्यात धन्यता मानतात.
-स्वप्नील महिंद्रकर, ठाणे शहराध्यक्ष, जनहित-विधी विभाग, मनसे.
आम्ही या विभागात गेल्या २० ते २५ वर्षापासून राहत असून येथे नालेसफाई न झाल्यामुळे लोकांच्या घरी पाणी घुसते. त्यामुळे येथे डेंगू मलेरिया सारखे आजार पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर होतात आणि त्याचा नाहक त्रास आम्हाला भोगावा लागतो.
-मनिष सावंत, रहिवासी-गांधीनगर.