ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
पार्किंग पॉलिसी नियोजनाला बैठकांद्वारे गतिमानता
पॉलिसी अंमलबजावणीवेळी स्थळनिहाय सर्वेक्षण करुन तेथील आवश्यकता तपासण्याची गरज -राजेश नार्वेकर
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सुनियोजित पार्किंग व्यवस्थापनाकडे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचे बारकाईने लक्ष असून याबाबत सातत्याने आढावा बैठकांद्वारे पार्किंग पॉलिसी नियोजनाला गतिमानता दिली जात आहे.
याविषयी १८ जुलै रोजी झालेल्या विशेष बैठकीत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शहरातील पार्किंग विषयक नियोजन कार्यवाहीच्या पहिल्या टप्प्यामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने वाहतूक पोलीस विभागासमवेत केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरातील वाहनांची संख्या आणि पार्किंगच्या जागा यांच्या उपलब्ध माहितीचा अभ्यास करुन उपाययोजना सुचवून त्याची अंमलबजावणी करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. पार्किंग नियोजनाविषयी शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म अशा दोन पातळ्यांवर काम करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. शॉर्ट टर्ममध्ये सध्या उपलब्ध सुविधांच्या अनुषंगाने सुनियोजित पार्किंग उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येणार असून लाँग टर्ममध्ये भविष्याचा वेध घेऊन शहरासाठी पार्किंगच्या आवश्यक सोयी-सुविधांची उपलब्धता करुन देण्याचे आयुक्तांचे नियोजन आहे.
सदर बैठकीस शहर अभियंता संजय देसाई, उद्यान विभागाचे उपायुक्त दीपक नेरकर, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील बोंडे, कार्यकारी अभियंता शुभांगी दोडे, इस्टेट मॅनेजर अशोक अहिरे, आदि उपस्थित होते.
नवी मुंबई महापालिका, वाहतूक पोलीस विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभाग या तिन्ही विभागांच्या समन्वयाने नवी मुंबईतील पार्किंग धोरणाला आकार मिळावा अशी भूमिका नजरेसमोर ठेवून आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने वारंवार आढावा बैठकांचे आयोजन करुन गतिमान पावले उचलली जात आहेत.
पार्किंग पॉलिसीची प्रभावी अंमलबजावणी करताना स्थळनिहाय सर्वेक्षण करुन तेथील आवश्यकता तपासण्याची गरज असल्याचे लक्षात घेत शहर नियोजनातील पार्किंगचे महत्व, आर्थिकदृष्ट्या लाभदायित्व तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे पार्किंग नियोजनाची उत्तम अंमलबजावणी अशा विविध बाबींचा सांगोपांग विचार सदर बैठकीत करण्यात आला.
नवी मुंबई सारख्या झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरामध्ये नागरिकांचा आर्थिक स्तरही उंचावल्यामुळे वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. एकीकडे सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याची भूमिका जपण्यासोबत उपलब्ध पार्किंग जागांचा विकास करण्याकडेही लक्ष दिले जात आहे. शहरातील सध्याची पार्किंगची स्थिती लक्षात घेऊन अभियांत्रिकी आणि वाहतूक पोलीस विभागाने केलेल्या पाहणी अहवालाचा साकल्याने विचार करुन उपाययोजना सूचवाव्यात. याबाबतची कार्यवाही तत्परतेने करावी.
-राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका.