‘शिवसेना'ची मेरियट हॉटेलवर धडक  

नवी मुंबई : मराठी कर्मचाऱ्यांना कामावरुन अचानक कमी केल्यामुळे ‘शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)'च्या वतीने १५ फेब्रुवारी रोजी तुर्भे एमआयडीसी मधील मेरियट हॉटेल वर धडक देण्यात आली. ‘शिवसेना'च्या या आंदोलनामुळे मेरियट हॉटेल व्यवस्थापनाने कामावरुन कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, सदर आंदोलनामुळे कामावरुन काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरी मिळाल्याने त्यांनी शिवसेना पक्षाचे आभार मानले आहेत.  

तुर्भे एमआयडीसी मधील मेरियट हॉटेलमध्ये काम करणाऱ्यांना मराठी कर्मचाऱ्यांना हॉटेल प्रशासनाने अचानक कामावरुन कमी केले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर ‘भारतीय कामगार सेना'चे चिटणीस संदीप राऊत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी १५ फेब्रुवारी रोजी मेरियट हॉटेलवर धडक देऊन व्यवस्थापन मराठी कर्मचाऱ्यांना अचानक कामावरुन काढून टाकण्याचा जाब विचारला. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात आले आहे, त्यांना तातडीने पुन्हा कामावर घेण्यात यावे. कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय झाला तर ‘शिवसेना'च्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी संदीप राऊत यांनी मेरियट हॉटेल व्यवस्थापनाला दिला.  

त्यानंतर हॉटेल व्यस्थापनाने ज्या मराठी कर्मचाऱ्यांना कमी केले होते, त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आश्वासन दिले. हॉटेलला मनुष्यबळ पुरवणारा ठेकेदार बदलल्यामुळे या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले होते. मात्र, यापुढे ठेकेदार जरी बदलला तरी या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करु नये, अशी सूचना ‘शिवसेना'च्या शिष्टमंडळाने केली.
सदर आंदोलनामध्ये ‘शिवसेना'चे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल  मोरे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, महानगरप्रमुख सोमनाथ वास्कर, शहरप्रमुख काशिनाथ पवार, उपशहरप्रमुख प्रकाश चिकणे, महेश कोटीवाले, विभागप्रमुख बाळकृष्ण खोपडे यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पश्चिम बंगालच्या संदेशखालीचे ठाण्यात पडसाद