पनवेलच्या भंगारपाडा गावातील गावठी हातभट्टी दारुची भट्टी उध्वस्त    

नवी मुंबई : पनवेल शहर पोलिसांनी बुधवारी दुपारच्या सुमारास भंगारपाडा गावालगतच्या जंगलात हातभट्टीची गावठी दारु गाळणाऱया भट्टीवर छापा मारुन सदर भट्टी उध्वस्त केली. या कारवाईत पोलिसांनी 60 हजार रुपये किंमतीची 3 हजार लिटर कच्च्या दारुचे नवसागर द्रव्य तसेच दारु बनविण्यासाठी लागणारे साहित्य जफ्त करुन ते नष्ट केले आहे. सदर दारुची भट्टी चालविणारा कुणीही पोलिसांच्या हाती लागले नाहीत, त्यामुळे पोलिसांकडुन सदर भट्टी चालविणाऱयांचा शोध घेण्यात येत आहे.  

भंगारपाडा गावालगतच्या जंगलामध्ये काही व्यक्ती अवैधरित्या हातभट्टीची गावठी दारु गाळून तयार करत असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे व गुन्हे प्रकटीकरण पथकाने बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भंगारपाडा गावा लगतच्या जंगलामध्ये छुफ्या पद्धतीने सुरु असलेल्या दारु   गाळण्याच्या भट्टीवर छापा मारला. यावेळी पोलिसांना त्या ठिकाणी कुणीही सापडले नाही.

 मात्र त्याठिकाणी गावठी दारुचे 250 लिटरचे 12 प्लास्टिकच्या बॅरेल मध्ये 60 हजार रुपये किंमतीची 3 हजार लिटर कच्च्या दारुचे नवसागर द्रव्य आणि दारु बनिवण्यासाठी लागणारे नरसाळे, 15 लिटर मापाचे 2 पत्र्याचे डबे व कच्च्या दारुचे नवसागर व द्रव्य नमुना आदी साहित्य सापडले. पोलिसांनी सदरचे साहित्य जफ्त करुन त्या ठिकाणी सापडलेले 3 हजार लिटर कच्ची दारु जागेवरच नष्ट केली. या कारवाईनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन सदर गावठी दारुची भट्टी कोणाची आहे, त्यात किती आरोपींचा सहभाग आहे याचा पोलिसांकडुन तपास करण्यात येत आहे.    

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

वाशीतील बार मधील कर्मचाऱ्याच्या हत्या प्रकरणातील त्रिकुट जेरबंद