म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
नवी मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नवी मुंबईतील बेलापूर शाखेतर्फे, राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त चमत्कारामागील विज्ञान कार्यक्रमाचे सादरीकरण २८ फेब्रुवारी रोजी बेलापूरमधील विद्या उत्कर्ष मंडळाच्या आर्ट, कॉमर्स ॲन्ड सायन्स महाविद्यालयात करण्यात आले.
नाविन्याचा शोध घेणे हा विज्ञान युगाचा मंत्र आहे. शोध प्रक्रियेतून विज्ञानाचा विस्तार झाला आहे. निसर्गाच्या घडामोडींचा डोळसपणे अभ्यास करून त्यामागील कार्यकारणभाव समजून घेणे म्हणजे विज्ञान समजून घेणे. डोळसपणे विचार करायचा आळस केल्यास निसर्गातील घडामोडींकडे चमत्कार म्हणून पाहण्याची मानसिकता येते. ही मानसिकता प्रगतीला खीळ घालते. विज्ञान कृतीशील चिकित्सा करते. विज्ञानाची सत्यता तपासता येते. आपल्या रोजच्या जीवनात आपण विज्ञानातून शोधलेल्या सुखसुविधा वापरत असतो. परंतु मानसिकतेतील वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावातून विज्ञानाकडे चमत्कार म्हणून पाहतो. मानव समूहाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपल्या सर्वांनी विज्ञानाची कास धरली पाहिजे असा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात अशोक निकम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय मराठे, उप-प्राचार्य डॉ. संजय गायकवाड, प्रा.वैशाली ढमाळ, अनुष्का जाधव, चांदणी पाटील, संकेत शेळके व शेख उपस्थित होते. कार्यक्रमाला ७५ विद्याथ्यार्ंसह महाराष्ट्र अंनिस कार्यकर्ते महेंद्र राऊत व ज्योती क्षिरसागर यांनीही उपस्थिती दर्शवली.