‘सुलेखन प्रदर्शन'द्वारे मराठी भाषेचा गौरव

नवी मुंबई : २७ फेब्रुवारी रोजीच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नवी मुंबई महापालिकेच्या वतीने अच्युत पालव स्कुल ऑफ कॅलिग्राफी यांच्या सहयोगाने २४ ते २८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ‘उत्सव मराठी भाषेचा' या खुल्या सुलेखन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या शुभहस्ते या प्रदर्शनाचा शुभारंभ संपन्न झाला. याप्रसंगी परिमंडळ-१चे उपायुक्त सोमनाथ पोटरे, सुलेखनकार अच्युत पालव, जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे, ‘अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघटना'चे राष्ट्रीय उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, रंगकर्मी अशोक पालवे आणि श्रीहरी पवळे तसेच सुलेखनकार कलावंत आणि मराठी भाषा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुलेखनकार अच्युत पालव नवी मुंबई शहराचे भूषण असून शहर सुशोभिकरणाचे राजदूत आहेत. स्वच्छता-सुशोभिकरणासह महापालिकेच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचे सक्रिय योगदान असून मराठी भाषेच्या गौरवासाठी त्यांनी राबविलेला सुलेखन उपक्रम नागरिकांमध्ये मराठी भाषा विषयक प्रेम वाढवेल, असा विश्वास उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी यावेळी व्यक्त केला.

विशेष म्हणजे यावेळी अच्युत पालव यांनी ‘निश्चय केला, नंबर पहिला' असे नवी मुंबई महापालिकेचे ध्येयवाक्य सुलेखनातून मोठ्या कागदावर रेखाटत ‘मराठी राजभाषा गौरव दिन'च्या शुभेच्छाही सुलेखनातून सर्वांना दिल्या. ‘अच्युत पालव स्कुल ऑफ कॅलिग्राफी'चे प्रशिक्षणार्थी शशिकांत गवंडे, तृप्ती माने फुरिया यांनीही सुलेखनद्वारे मराठी भाषेची महती आकर्षक अक्षरलेखनातून प्रकट केली.

ज्यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो, अशा कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रसिध्द कविता सदर प्रदर्शनामध्ये रसिकांना लक्षवेधी सुलेखनातून अनुभवयास मिळणार असून अनेक दिग्गज कवी, लेखकांचा अक्षर साहित्याचा अनुभव याठिकाणी रसिकांना घेता येणार आहे.

सुलेखन म्हणजे काहीतरी आगळेवेगळे आहे असा समज डोक्यातून काढून टाकून नागरिकांनी सुलेखन प्रदर्शन बघावे. सुलेखनाचे विशेष प्रशिक्षण न घेतलेल्या आपल्या सारख्याच सर्वसामान्यांनी साकारलेल्या सुलेखानाचा आस्वाद घ्यावा आणि आपलेही अक्षर सुंदर असावे, असा ध्यास घेऊन सुलेखन करण्याचे आवाहन यावेळी अच्युत पालव यांनी केले.

सदर प्रदर्शनामध्ये अच्युत पालव यांच्यासह श्रीकांत गवंडे, श्वेता राणे, अनिता डोंगरे, तेजस्विनी भावे, अमृता अमोदकर, तृप्ती माने फुरिया, हर्षदा साळगांवकर, यतिन करळकर, प्रसाद सुतार, मनिषा नायक, पुजा गायधनी, रूपाली ठोंबरे, निलेश गायधनी, रोहिणी निंबाळकर, रसिका कोरगांवकर, वैशाली अधिकारी यांनी सुलेखनातून कविता आणि मराठी साहित्यकृतींतील वाचनीय उतारे आकर्षक रितीने अक्षरालंकृत केलेले आहेत.
 

अत्यंत ऐश्वर्यसंपन्न अशा मराठी भाषेचा गौरव व्हावा आणि मराठी भाषेची महती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, विशेषत्वाने नव्या पिढीला याचे महत्त्व कळावे आणि मराठी भाषेची गोडी वाढावी यादृष्टीने अच्युत पालव स्कुल ऑफ कॅलिग्राफी यांच्या सहयोगाने नवी मुंबई महापालिका तर्फे आयोजित ‘उत्सव मराठी भाषेचा' असे खुले सुलेखन अक्षर प्रदर्शन वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात २८ फेब्रुवारी पर्यंत २४ तास खुले आहे. या सुलेखन प्रदर्शनाला मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने आपल्या कुंटुंबियांसह आवर्जुन भेट देऊन मराठी भाषेची संपन्नता अनुभवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘केडीएमसी'तर्फे ‘कचरामुक्त तारांकित सोसायटी स्पर्धा'चे आयोजन