एपीएमसी आवारात लाकडी पेट्या बनवणाऱ्यांवर महापालिका तर्फे कारवाई

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजाराच्या मागील बाजूच्या समाईक रस्त्याच्या पदपथावर लाकडी पेट्या बनवणाऱ्या व्यावसायिकांवर नवी मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे कारवाई करण्यात आली. मात्र, सदर सामायिक रस्ता एपीएमसी प्रशासनाचा असून, येथील व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी एपीएमसी संचालक मंडळाच्या परवानगीने परवाने दिले आहेत.त्यामुळे महापालिका प्रशासनाने एपीएमसी आवारात लाकडी पेट्या बनवणाऱ्यांवर कारवाई करताना एपीएमसी प्रशासनाला विश्वासात घ्यायला हवे होते, असा दावा एपीएमसी प्रशासनाने केल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.

मार्च  महिना सुरु होताच हापूस आंब्याचा मुख्य हंगाम  सुरु  होतो. त्यामुळे एपीएमसी फळ बाजारात मोठया प्रमाणात आंब्याची विक्री होत असते. हापूस आंब्याची ने-आण करण्यासाठी लाकडी पेट्या आवश्यक असतात.त्यामुळे लाकडी पेट्या बनवणाऱ्या व्यावसायिकांनी एपीएमसी बाजार आवाराच्या आसपासच आपले व्यवसाय थाटण्यास सुरुवात करतात. एपीएमसी फळ मार्केट  मागील समाईक रस्त्याच्या पदपथावर देखील लाकडी पेट्या बनवण्याचे व्यवसाय थाटण्यात आले आहेत. मात्र, महापालिका अधिनियम, महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम १९६६ अन्वये महापालिका हद्दीत  कुठल्याही अतिक्रमणावर कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेला आहेत.तर बाजार समिती, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विनियमन) अधिनियम प्रमाणे चालते. एपीएमसी प्रशासन फक्त  व्यावसायिकांना बाजार समिती निगडित व्यवसाय परवाना देते. महापालिका द्वारे ज्या ठिकाणी करण्यात आली ती जागा रस्त्याच्या कडेला होती. मात्र, या जागेवर एपीएमसी प्रशासनाने स्वतःचा दावा सांगितला असून, तेथील लाकडी पेटी व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास एपीएमसी संचालक मंडळाच्या परवानगीने परवाने दिले आहेत. त्यामुळे २९ मार्च रोजी नवी मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी महापालिका तुर्भे विभाग  अधिकारी भरत धांडे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद लाभला नाही.

वाशी मधील एपीएमसी फळ बाजारात नोव्हेंबर-२०२२ मध्ये  कागदी पुठ्ठे आणि लाकडी खोक्यांना आग लागून २० ते २५ गाळे आगीच्या भक्ष्यस्थानी गेले होते. त्यामुळे येथील अतिक्रमणामुळे आगीच्या घटना घडू नयेत याकरिता नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलाने वारंवार  सूचना दिल्या आहेत. सदर आगीनंतर एपीएमसी प्रशासनाने देखील एक समिती नेमली होती. या समितीच्या अहवालात देखील  एपीएमसी बाजार आवारातील अतिक्रमणावर ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे एपीएमसी बाजार आवारातील अतिक्रमणावर ठपका ठेवण्यात आल्याचा अहवाल असून, देखील एपीएमसी प्रशासनाने लाकडी खोके व्यावसायांना रस्त्यावर परवानगी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

एपीएमसी फळ मार्केटच्या मागील बाजूला असलेला सामायिक रस्ता ‘एपीएमसी'च्या मालकीचा असून, त्याबाबत एपीएमसी प्रशासनाने नवी मुंबई महापालिकेला तीन पत्र दिली आहेत.तसेच लाकडी खोके व्यावसायिकांना एपीएमसी प्रशासनाने परवाने दिले आहेत. त्यामुळे २९ मार्च रोजी नवी मुंबई महापालिकेने लाकडी खोके व्यावसायिकांवर कारवाई करण्याआधी एपीएमसी प्रशासनाला विश्वासात घेतले असते तर सविस्तर माहिती दिली असती. याबाबत एपीएमसी प्रशासनाने महापालिका अधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले होते. मात्र, चार तास उलटले तरी महापालिका अधिकारी आले नाहीत. - सुरेश मोहाडे, कार्यकारी अभियंता - मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी), वाशी. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 पावणे मधील २०० झाडांची लवकरच कत्तल?