वस्तीतील मुलांनी सादर केला भारतीय संस्कृती, परंपरा व नृत्याचा अविष्कार  

नवी मुंबई : नवी मुंबईतील कचरा वेचकांच्या मुलांसाठी स्त्री मुक्ती संघटनेने श्रीराम राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्टच्या सहकार्याने सुरु केलेल्या अभ्यास वर्गातील मुलांचा सांस्कृतीक कार्यक्रम रविवारी वाशीतील विष्णुदास भावे नाटयगृहात मोठया उत्साहात पार पडला. या अभ्यास वर्गाच्या मुलांनी भारतीय संस्कृती, भारतीय एकात्मता व परंपरा, अभिजात नृत्य इत्यादीचा थक्क करणारा अविष्कार सादर केला. त्याशिवाय या विद्यार्थ्यांनी सद्यस्थितीवरील समस्यांचा आढावा घेणारी नाटिका सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

कचरा वेचणा-यांची मुले पुन्हा कच-याच्या कामात पडू नयेत, त्यांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी श्रीराम राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्टने विडा उचलल्याने वस्तीतील मुले शाळेत जाऊ लागली. मात्र त्यांचे शिकणं होत नसल्याने स्त्री मुक्ती संघटनेने कचरा वेचकांच्या मुलांसाठी अभ्यास वर्ग सुरु केले. संध्याकाळी दोन तास चालणा-या या विद्यार्थ्यांच्या अभ्यास वर्गाला बळकटी देण्यासाठी श्रीराम ट्रस्टने पुढाकार घेऊन या मुलांची फी भरणे, अभ्यासवर्गात दिवापाण्याची सुविधा देणे, तसेच त्यांना क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे काम राधाकृष्णन आणि ललिता या जोडीने केले.  

याच अभ्यास वर्गातील मुलांचा सांस्कृतीक कार्यक्रम वाशीतील विष्णुदास भावे नाटयगृहात मोठया उत्साहात पार पडला. यावेळी अभ्यास वर्गातील मुलांनी भारतीय संस्कृती, भारतीय एकात्मता व परंपरा, अभिजात नृत्य सादर केला. तसेच या विद्यार्थ्यांनी सद्यस्थितीवरील समस्यांचा आढावा घेणारी नाटिका देखील सादर केली. यावेळी श्रीराम राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष राधाकृष्णन व ललिता यांनी शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे काम या संस्थेकडून अविरत चालू राहील असे स्पष्ट केले. तर स्त्राr मुक्ती संघटनेच्या वृषाली मगदूम यांनी श्रीराम राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्ट व स्त्री मुक्ती संघटनेचा समन्वय कायमस्वरुपी राहावा व झोपडपट्टीतील मुले शिक्षणाच्या प्रवाहात येऊन त्यांचे भविष्य सुकर व्हावे, असा आशावाद व्यक्त केला.  

याप्रसंगी ब्रिगेडियर धरमप्रकाश, अनिल कर्ता, के.आर.गणेश, एस राघवन, राजेश ग्रोवर आदी विश्वस्त उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी ठाणे, कळवा, दिघा, रबाळे, बेलापूर बोनसरी, खांदेश्वर, पनवेल इत्यादी वस्त्यांवरील सव्वा चारशे मुले व त्यांचे पालक उपस्थित होते. संगीता साबळे व अजित खताळ यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर जयश्री वर्पे, कविता, अमोल, प्रियांका, सिमरन, राहुल पवार, सुप्रिया, सारिका आदी शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शाळेसाठी पारसिक टेकडीच्या तळावर घाव