३० वर्ष जुन्या इमारतींना स्ट्रवचरल ऑडीट अनिवार्य
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतीचे सन २०२४-२५ या वर्षासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानंतर एकूण ५३५ इमारती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २६४ पोटकलम (१) (२) (३) (४) अन्वये धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत.
दुसरीकडे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २६५(अ) नुसार ज्या इमारतींचा वापर सुरु होऊन ३० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे, अशा इमारतींचे नवी मुंबई महापालिकेकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्याकडून किंवा संरचना अभियंत्याकडून संरचना परीक्षण करुन घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
३० वर्षापेक्षा जास्त काळ इमारतीचा वापर किंवा इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र (पूर्ण अथवा अंशतः) क्षेत्रफळ वापराखाली आणले गेले अशा दिवसापासून मोजावयाचा आहे. नेमलेल्या संरचना अभियंत्याने शिफारशी केलेली दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्याचे आणि ते बांधकाम सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र नवी मुंबई महापालिकेकडे सादर करावे, असे सूचित करण्यात आले आहे. ३० वर्षापेक्षा जास्त काळ झालेल्या इमारतीचे संरचनात्मक परीक्षण ३० सप्टेंबर २०२४ पूर्वी पूर्ण करुन याबाबतचा अहवाल संबधित विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी किंवा सहाय्यक संचालक नगररचना, नवी मुंबई महापालिका यांच्याकडे सादर करावयाचा आहे.
नवी मुंबई महापालिकेने संरचनात्मक परीक्षक (स्ट्रक्चरल इंजिनियर) यांची यादी महापालिकेच्या www.nmmc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिलेली आहे.
या प्रकारे संरचना परीक्षण करण्याचे उत्तरदायित्व जी संस्था, मालक, भोगवटादार पार पाडण्यास टाळाटाळ करतील, त्यांना २५,००० रुपये अथवा सदर मिळकतीच्या वार्षिक मालमत्ता कराची रक्कम यातील जी जास्त असेल तितक्या रक्कमेचा दंड ठोठावावयाची तरतूद महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ३९८ (अ) खाली अंतर्भूत करण्यात आलेली आहे, असे महापालिका तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
धोकादायक झालेल्या इमारतींचा, घरांचा वापर करणे जिकरीचे आहे. त्यामुळे जीवित आणि वित्त हानी होऊ शकते म्हणून नागरिकांकडून धोकादायक इमारतींचा, घराचा रहिवास वापर तात्काळ थांबविण्यात यावा, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच दुर्दैवी अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबधितांची राहील याची नोंद घेण्यात यावी, असेही महापालिकेने सूचित केले आहे.
दरम्यान, ‘नेमेचि येता पावसाळा' या उवतीनुसार महापालिका पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक इमारतींची यादी प्रसिध्द करतानाच या इमारतींमध्ये रहिवास करु नये, असे आवाहन देखील करते. पण, याच धोकादायक इमारतींमध्ये आजवर रहिवास असल्याचे दिसून येत आहे. महापालिका या धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना इतरत्र सुखरुप स्थळी अथवा संक्रमण शिबिरात जाण्यासाठी कार्यवाही करताना दिसून येत नाही. तसेच इमारतींच्या स्ट्रवचरल ऑडीट करण्याबाबतही महापालिका प्रशासन म्हणावे तेवढे गंभीर दिसत नाही. आता फवत पावसाळा सुरु होण्यापूर्वी महापालिकेने फवत औपचारिकता केली आहे. धोकादायक इमारती जाहीर केल्यानंतर त्याबाबत आजवर केलेली कार्यवाही तसेच स्ट्रवचरल ऑडीट बाबतही महापालिकेने जाहीरपणे त्याची आकडेवारी प्रसिध्द करणे आवश्यक आहे, असे नवी मुंबईतील नागरिकांचे म्हणणे आहे.