लोकनेते दि. बा. पाटील जयंती दिनी नवी मुंबईमध्ये महारोजगार मेळावा
100 पेक्षा अधिक कंपन्यांचा सहभाग
नवी मुंबई : लोकनेते दि. बा. पाटिल यांच्या जयंतीदिनी म्हणजेच येत्या 13 जानेवारी 2023 रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात सकाळी 9 वाजेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये या महारोजगार मेळाव्याचे आयोजक माजी खासदार संजीव नाईक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
महारोजगार मेळावा आणि रोजगार व स्वयंरोजगार, उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त आणि सर्व स्थानिक नवी मुंबईकरांसाठी करण्यात आले आहे. रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या आणि विशेष करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने निर्माण होत असलेल्या रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योजकता विकासाच्या संधींची माहिती देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय संघर्ष कृती समिती यांच्या सहयोगाने तसेच संजीव नाईक यांच्या माध्यमातून हा महारोजगार मेळावा पार पडणार आहे.
केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील, आमदार गणेश नाईक , नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील , संजीव नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा महारोजगार मेळावा पार पडणार आहे.
श्री गणेशजी नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या विद्यमाने मागील अनेक वर्षे आम्ही नियमितपणे महारोजगार मेळाव्यांचे आयोजन करीत आहोत. आतापर्यंत आठ महारोजगार मेळावे पार पडले आहेत. त्यामधून शेकडो उमेदवारांना त्यांच्या स्वप्नातील रोजगार आणि स्वयंरोजगार प्राप्त झाल्याचे नाईक यांनी सांगितले. या महारोजगार मेळाव्यामध्ये फॅसिलिटी मॅनेजमेंट, फिनान्स, इन्शुरन्स, सिक्युरिटी, उत्पादन, टयुटोरियल्स, इंजिनिअरिंग, फूड, रिटेल, कम्प्युटर हार्डवेअर ऍन्ड नेटवर्कींग, हॉस्पिटल्स, सेल्स ऍन्ड मार्केटींग, हॉटेल इंडस्ट्री इत्यादी क्षेत्रातील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने निर्माण होत असलेल्या विविध रोजगार, उद्योजकता विकास आणि स्वयंरोजगाराच्या संधीची माहिती आणि या संधी प्राप्त करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञांचे आणि यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन शिबिर महारोजगार मेळाव्यात पार पडणार आहे. केंद्र सरकारचा सूक्ष्म, लघु आणि मध्यम मंत्रालय म्हणजेच एमएसएमई, कौशल्य विकास मंत्रालय, सिडको महामंडळ, देखील या महारोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत. नवी मुंबई विमानतळाच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या संधीमध्ये स्टार्टअप सुरू करण्यासाठी तंत्रज्ञानाची माहिती या महारोजगार मेळाव्यात मिळणार आहे. स्टार्टअप सुरू करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, सरकारी परवाने, मंजुऱ्या, व आवश्यक अन्य बाबींचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नवी मुंबई महापालिका यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती या महारोजगार मेळाव्यामध्ये मिळणार आहे. यशस्वी मुलाखतीसाठी उमेदवारांना तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभणार आहे. करियर विषयक मार्गदर्शन केले जाणार आहे. मेळाव्यात ज्यांना नोकर्या मिळणार आहेत त्यांना मान्यवरांच्या हस्ते तात्काळ नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबई आणि परिसरातील विकासाला चालना मिळणार असून उद्योग, व्यवसाय, रोजगार आणि स्वयं रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहेत.
या संधीचा लाभ प्राधान्याने स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त आणि एकूणच सर्व स्थानिक नवी मुंबईकरांना मिळायला पाहिजे. यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, सिडको महामंडळ यांना सुचित करणार आहोत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने लागणारा विविध कर्मचारी वर्ग, हॉटेल, लॉजिस्टिक, कस्टम, सुरक्षारक्षक, ट्रान्सपोर्टेशन, एफएमसीजी, टुरिझम, ई-कॉमर्स प्रवासी वाहतूक अशा सर्वच क्षेत्रांमध्ये संधी निर्माण होणार आहे. याविषयी माहिती देणारे तज्ञांचे सेमिनार या महारोजगार मेळाव्यामध्ये आयोजित करण्यात आले आहे. डॉक्टर नाईक म्हणाले, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरामध्ये निर्माण होणाऱ्या, रोजगार स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या संधींची फक्त माहिती देऊन आम्ही थांबणार नाही आहोत तर प्रत्यक्षात उमेदवारांना या संधींचा लाभ कसा होईल, यासाठी नियमितपणे मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करणार आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मेक इन इंडिया, स्किल इंडिया आणि मेक इन महाराष्ट्रातून नवउद्योजक घडत आहेत. मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत जगातील पाचवी मोठी अर्थसत्ता म्हणून उदयास आली आहे. जगातील पहिल्या तीन आर्थिक महासत्तांमध्ये आपला देशाचा समावेश निश्चित होईल. या विनामूल्य महारोजगार मेळाव्याचा लाभ तरुण आणि तरुणींनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन संजीव नाईक यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला माजी महापौर जयवंत सुतार, जिल्हा भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा माधुरी सुतार, माजी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, नवीन गवते, प्रकाश मोरे, अशोक गुरखे, युवा नेते संकल्प नाईक, समाजसेवक विजय वाळुंज, प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे दीपक पाटील आणि मनोहर पाटील आदि उपस्थित होते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी प्राप्त करण्यासाठी तशा प्रकारचे शिक्षण उमेदवारांनी घ्यावे. शिक्षण घेतल्यानंतर ज्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी प्रशिक्षण उपलब्ध केले जाईल. -संजीव नाईक, आयोजक महारोजगार मेळावा.