आ. विश्वनाथ भोईर यांचा ‘ केडीएमसी'ला ५ दिवसांचा अल्टीमेटम

कल्याण : ‘केडीएमसी'ला नालेसफाईसाठी ५ दिवसांचा अल्टीमेटम देत नालेसफाई जर नीट झाली नाही, तर केडीएमसी अधिकारी आणि कंत्राटदारांची कोणतीही हयगय केली जाणार नसल्याचा इशारा ‘कल्याण-पश्चिम'चे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शहरांतील नालेसफाई व्यवस्थित झाल्या नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी आमदार भोईर यांच्याकडे केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आमदार भोईर यांनी कल्याण मधील प्रमुख नाल्यांची पाहणी करत ‘केडीएमसी'ला सदर इशारा दिला.

पावसाळा सुरु व्हायला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, कल्याण पश्चिम मधील नाल्यांची सफाई योग्य तऱ्हेने होत नसल्याच्या तक्रारी आ. विश्वनाथ भोईर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेत आमदार भोईर यांनी ३१ मे रोजी तातडीने कल्याण पश्चिम मधील स्टेशन रोड आणि बैल बाजार येथील प्रमुख नाल्यांची केडीएमसी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. त्यावेळी सदर नाल्यांमध्ये कचरा तसाच साचलेला आढळून आल्याने संतप्त झालेल्या आमदार भोईर यांनी ‘केडीएमसी'च्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून आले.

यावेळी ‘केडीएमसी'च्या शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ आणि इतर अधिकारी उपस्थित होते. नालेसफाईसाठी ‘केडीएमसी'कडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, सदर सर्व पैसा जनतेच्या खिशातून आलेला असून त्याची उधळपट्टी आपण होऊ देणार नाही, अशा शब्दांत आमदार भोईर यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

दरम्यान, यावेळी ‘केडीएमसी'चे अभियंता घनश्याम नवांगुळ यांनी नालेसफाई केली असल्याचे आमदार भोईर यांना सांगितले. मात्र, नालेसफाई झाली असे तुम्ही सांगता मग नाल्यात कचरा आणि गाळ कसा काय आहे? असा सवालही भोईर यांनी यावेळी उपस्थित केला.

जनतेच्या पैशांची उधळपट्टी करणारी आणि लोकांच्या डोळ्यात धूळफेक करणारी नालेसफाई आपल्याला मान्य नाही. लोकांना आम्हाला उत्तरे द्यावी लागतात. पुढील ५ दिवसात कल्याण पश्चिम मधील सर्व प्रमुख नाल्यांची सफाई योग्य तऱ्हेने झाली पाहिजे. आपण ५ दिवसांनी पुन्हा पाहणी करु आणि आपल्याला कुठे नाले सफाई झाली नसल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराची कोणतीही गय करणार नाही. - आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण पश्चिम.


जरीमरी नाला याठिकाणी १० ते १८ मे या दरम्यान पोकलेन उतरवली होती. नाल्यात वाहत येणारा गाळ ६ महिने साफ करत राहणार आहोत. आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करूरुन आवश्यकता पडल्यास ठेकेदारांवर कठोर कारवाई करु. - घनश्याम नवांगुळ, कार्यकारी अभियंता-केडीएमसी. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 १७ ग्रामपंचायतींकडे घंटागाडी नसल्याची बाब उघड