पनवेल मध्ये सलग दुसऱ्या दिवशी १ कोटीहुन अधिक कर वसुली

पनवेल  : पनवेल महापालिकेच्या कर संकलन-कर आकारणी विभागाच्या वतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्ती पूर्व नोटीसा दिल्यानंतर आता मालमत्ता कर भरण्यास नागरिकांचा प्रतिसाद वाढला आहे. चारही प्रभागातील ११ वसुली पथकांच्या माध्यमातून सलग दुसऱ्या दिवशी १ कोटी हून अधिक थकीत कर वसूल करण्यात आला आहे.

दुसरीकडे आयुक्त गणेश देशमुख यांच्या सुचनेप्रमाणे जप्तीपूर्व नोटीसानंतर ७ दिवसांचा कालावधी पूर्ण होऊनही मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना वॉरंट नोटिसा बजावण्याच्या कामास वेग आला आहे. वसुली पथकांच्या माध्यमातून खारघरमध्ये जप्तीपूर्व नोटीसा दिलेल्या ५ थकीत मालमत्ताधारकांवरती अटकावणी कारवाई करण्यास गेले असता ४ थकीत मालमत्ता करधारकांनी आपला २० लाख रुपयांचा थकीत कर भरल्याने त्यांच्यावरील अटकावणी कारवाई स्थगित करण्यात आली. तसेच यावेळी वसुंधरा २ सोसायटीमधील वसंत हिराजी पटेल यांच्या सभागृहावर अटकावणी कारवाई करण्यात आली.

आजवर महापालिकेने सातत्याने नागरिकांना सवलती देऊन मालमत्ता कर भरण्याबाबत आवाहन केले आहे. परंतु, आता महापालिकेने थकबाकीदारांच्या विरोधात कठोर पावले उचलण्यास सरुवात केली आहे. ज्या थकबाकीदारांना जप्ती नोटिसा दिल्या होत्या, अशा थकबाकीदारांकडून मालमत्ता कर वसुलीसाठी कर अधीक्षक महेश गायकवाड आणि सुनील भोईर  यांच्या नेतृत्वाखाली वसुली पथकाच्या माध्यमातून चारही प्रभागातून सलग दुसऱ्या दिवशी १ कोटीहून अधिक मलमत्ता कर वसूल करण्यात आला आहे. या आर्थिक वर्षामध्ये सुमारे २७८ कोटींचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे.

दरम्यान, मालमत्ता कर न भरल्यास त्याच्या शास्तीमध्ये प्रतिमहा २ टक्क्यांची वाढ होत असल्याने तसेच  नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरावा, असे आवाहन सातत्याने महापालिकेच्या वतीने केले जात आहे. या आवाहनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. गेल्या २-३ दिवसापासून मालमत्ता कराच्या भरण्यामध्ये वाढ होताना दिसत आहे.

ऑनलाईन आणि विविध ॲपच्या माध्यमातून कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेत न येता ऑनलाईन पध्दतीने भरता यावा यासाठी महापालिकेने  'सिटीझन प्रॉपर्टी टॅक्स पेमेंट गाईड ' तयार केले आहे.

महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी ‘PMC TAX APP’  मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच www. panvelmc.org या वेबसाईटवर जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. मालमत्ताधारकांना काही शंका असल्यास 1800-5320-340 या टोल फ्री क्रमांवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका तर्फे करण्यात आले आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सिडको'तर्फे बामणडोंगरी गृहसंकुलातील २४३ दुकाने विक्रीसाठी उपलब्ध