नागरिक उन्हाच्या झळांनी हैराण; अधिकारी एसी केबीनच्या गारव्यात
कल्याण : कल्याण शहरातील सिंधीकेट येथील दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकारी एअर कंडिशनर केबिनमध्ये बसून कारभार हाकत आहेत. तर आपल्या घराचे रजिस्ट्रेशन करणाऱ्या नागरिकांना ४०.४२ डिग्री सेल्सिअसच्या तापमानात ताटकळत उभे राहावे लागत आहे. करोडो रुपयांचा महसूल स्टॅम्प ड्युटी मधून शासनाला मिळत असताना रजिस्ट्रेशन करण्यासाठी कार्यालयात येत असणाऱ्या नागरिकांना उन्हाच्या झळा खात ताटकळत बसावे लागत आहे.
कल्याण आणि आजुबाजुच्या ठिकाणाहून दुय्यम निबंधक कार्यालयात घरांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी सिंधीकेट येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दररोज मोठी गर्दी असते. रजिस्ट्रेशनच्या स्टॅम्प ड्युटीतून राज्य शासनाला करोडो रुपयांचा महसूल येथे मिळत आहे. सकाळ पासून रात्री उशिरापर्यंत येथे रजिस्ट्रेशनचे काम सुरु असतेे.
एकीकडे कडक उन्हाळ्यामुळे अंगाची लाहीलाही होत असून दुय्यम निबंधकांच्या कार्यालयाबाहेर रजिस्ट्रेशन करणारे नागरिक मात्र उकाड्यात घामाने मेटाकुटीला आल्याचे दिसत आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयात एकीकडे दलालांचा मोठा सुळसुळाट झाल्याची चर्चा असून दलालांमार्फत गेलेल्या नागरिकांना रजिस्ट्रेशन साठी प्रथम प्राधान्य येथे दिले जात आहे. त्यामुळे दलालांकडून आलेल्यांना येथे जास्त वेळ थांबावे लागत नसून अन्य नागरिकांना तसेच वकिलांना देखील रजिस्ट्रेशनच्या कामात जाणीवपूर्वक रखडवले जात आहे. ऐन कडक उन्हात दुय्यम निबंधक एसी केबिनमध्ये बसून रजिस्ट्रेशनचा कारभार हाकला जात असून सर्वसामान्य नागरिकांना मात्र दुय्यम निबंधकांच्या केबिन बाहेरील जागेत गरम फॅनच्या हवेत बसावे लागत आहे
राज्य शासनाला रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून स्टॅम्प ड्युटीचा महसूल करोडो रुपयांच्या रुपात मिळत आहे. नागरिकांकडून महसूल मिळत असताना उकाडाच्या दिवसात कुलर किंवा एसी बसविण्यासाठी दुय्यम निबंधक प्रयत्न का करत नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या संदर्भात दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांशी प्रतिक्रियाकरिता संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.