‘सिडको'च्या विविध प्रकल्पांना व्यवस्थापकीय संचालक सिंघल यांची भेट

नवी मुंबई : ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ‘सिडको'च्या विविध प्रकल्प स्थळांना भेट देऊन माहिती घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने व्हावी याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

‘सिडको'च्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विजय सिंघल यांनी १ मार्च रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्प स्थळाला भेट दिली होती. त्यानंतर ७ मार्च रोजी सिंघल यांनी एमटीएचएल उलवे जंक्शन साईट, प्रस्तावित युनिटी मॉल, भूमीपुत्र भवन, बामणडोंगरी गृहनिर्माण योजना, उलवे सागरी मार्ग कनेक्टिव्हिटी, जेएनपीए आणि सिडको अधिकार क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी, उलवे-द्रोणागिरी नोड आणि लॉजिस्टिक्स पार्क या प्रकल्प स्थळांना भेट दिली. सदर भेटी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांशी प्रकल्पाच्या सद्यस्थितीविषयी चर्चा करत प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.

याप्रसंगी ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, डॉ. कैलास शिंदे, दिलीप ढोले, मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, मुख्य नियोजनकार रविंद्र मानकर, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन-विमानतळ) गीता पिल्लई, मुख्य अभियंता (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ) शीला करुणाकरन, अतिरिक्त मुख्य अभियंता प्रभाकर फुलारी, जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे, आणि प्रकल्पांशी संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

‘सिडको'चे गृहनिर्माण, प्रस्तावित युनिटी मॉल, लॉजिस्टिक्स पार्क, आदि प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. या प्रकल्पांच्या भौतिक प्रगतीचा आढावा घेण्याकरिता प्रकल्पस्थळांना भेट दिली. सर्वसामान्य नागरिक, स्थानिक कारागीर, व्यावसायिक, प्रकल्पबाधित अशा विविध घटकांच्या हिताच्या दृष्टीने सदर प्रकल्प महत्त्वाचे असल्याने या प्रकल्पांची अंमलबजावणी वेगाने आणि नियोजित वेळेत व्हावी याकरिता संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत. -विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक-सिडको. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दिवाळे मधील ३२ महिलांना स्वयंरोजगारासाठी गाळे वाटप