मालमत्ता कर, पाणी बिल थकबाकीदारांना न्यायालयाची नोटीस
तुर्भे : नवी मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे साधन असलेला मालमत्ता कर आणि पाणी बिल यांची थकबाकी न भरणाऱ्या व्यवतींना न्यायालयाच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. लोक अदालतद्वारे या प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी दिली.
लोकअदालत या संकल्पनेव्दारे नागरिकांच्या शासकीय प्राधिकरणांकडे असलेल्या विविध सुविधांच्या देयकांबाबत तक्रारींविषयी सुनावणी घेऊन त्यावर योग्य तोडगा काढण्यात येतो. या अनुषंगाने येत्या ३ मार्च रोजी बेलापूर येथे राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. या लोकअदालतीमध्ये प्रिलिटीगेशन आणि पोस्टलिटीगेशन असे दोन प्रकारचे वाद ठेवण्यात आले होते. यामध्ये नागरिक, व्यापारी, शासकीय-निमशासकीय संस्था, उद्योग समुह अशा विविध घटकांचा समावेश आहे, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी सांगितले.
नवी मुंबई महापालिकेचा मालमत्ता कर न भरणाऱ्या ९४७ थकबाकीदांना लोक अदालतीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. ७५ हजार ते १ लाख पर्यंतचा मालमत्ता कर थकीत असलेल्या थकबाकीदाराना बजावण्यात आलेल्या या नोटिसीद्वारे एकूण ९ कोटी रुपयांची थकबाकी वसूल होण्याची अपेक्षा आहे. मागील लोक अदालत वेळी मालमत्ता कर न भरणाऱ्या १ हजार ९५० थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आली होती. त्या नोटीसीला प्रतिसाद देत ३८ लाखा पेक्षा अधिक रक्कमेचा कर वसूल झाला होता, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी दिली.
महापालिका पाणी पुरवठा विभागाद्वारे ५० हजार रुपयांच्या वरील १ हजार १३६ थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. ५० या नोटीसींद्वारे एकूण ४१.५३ कोटी रुपयांची थकबाकी वसूल होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती महापालिका अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील यांनी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्था कर आणि उपकर आता बंद झाले असून, त्याजागी वस्तू सेवा कर (जीएसटी) सुरु झाला आहे. उपकर आणि स्थानिक संस्था कर याची थकबाकी अद्याप न भरलेल्या महापालिका क्षेत्रातील थकबाकीदारांना देखील न्यायालयाच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. - सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त - नवी मुंबई महापालिका.