मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
‘महाराष्ट्र भवन'चे मे महिन्यात भूमीपुजन
नवी मुंबई : नवी मुंबई मधील बहुप्रतिक्षीत ‘महाराष्ट्र भवन'चे भूमीपुजन येत्या मे महिन्यामध्ये करण्यात येणार आहे. ‘महाराष्ट्र भवन' लवकरात लवकर उभे रहावे यासाठी स्थानिक ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
वाशी रेल्वे स्थानकानजिक सिडको एविझबिशन सेंटर जवळ महाराष्ट्र शासनाने ‘सिडको'च्या माध्यमातून ‘महाराष्ट्र भवन'साठी भूखंड राखीव ठेवलेला आहे. याठिकाणी बऱ्याच राज्यांची भवन्स उभी राहिलेली आहे. पण, ‘महाराष्ट्र भवन'च्या भूखंड वास्तू उभी रहायला खूप प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यामुळे आमदार सौ. मंदाताई मात्रे यांनी ‘महाराष्ट्र भवन'साठी सातत्याने पाठपुरावा करुन सरकारला सातत्याने विचारणा करीत होत्या. त्यांच्याच पाठपुराव्याची फलश्रुती म्हणून ‘सिडको'तर्फे ‘महाराष्ट्र भवन'चा आराखडा पूर्ण करण्यात आलेला असून त्याला लवकरच अंतिम स्वरुप देण्यात येईल.
यानंतर आगामी मे महिन्यात निवडणुकीची आचारसंहिता संपताच तातडीने मुख्यमंत्री आणि आम्हा सर्वांच्या हस्ते ‘महाराष्ट्र भवन'चे भूमीपुजन करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘विधानसभा'मध्ये अंतिम अर्थसंकल्पावर चर्चेवरील उत्तरावेळी केली.