७८४९ सिडको सोडतधारक कुटुंबांचे वाचले ४८० कोटी रुपये
नवी मुंबई : ‘सिडको'च्या माध्यमातून उलवे-बामणडोंगरी येथील ७,८४९ सिडको सोडतधारकांना ३५ लाख रुपये किंमतीच्या घरांचे दर कमी करावे म्हणून ‘नवी मुंबई मनसे'ने गेली १० महिने ‘सिडको'शी लढा दिला. ‘मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विषयात पुढाकार घेवून ते स्वतः या सिडको सोडतधारकांना भेटायला नवी मुंबईत आले. सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेताना सर्वसामान्यांना हक्काचे आणि परवडणारे घर मिळावे म्हणून राज ठाकरे यांनी सिडको सोडतधारकांना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्यासमोर सदरचा ज्वलंत प्रश्न मांडला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नासंदर्भात संवेदनशीलता दाखवत ‘सिडको'ला तसे निर्देश दिले. त्यानुसार ‘सिडको'च्या माध्यमातून येथील घरांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रति घरामागे ६ लाख रुपये कमी करुन आज २७ लाख रुपयांना ‘सिडको'चे घर प्रत्येकाला मिळणार आहे. यामुळे गोरगरीब सिडको सोडतधारकांचे जवळपास ४८० कोटी रुपये वाचले आहेत, अशी माहिती ‘मनसे'चे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली.
सदरचा सिडको सोडतधारकांसाठी मोठा ऐतिहासिक निर्णय आहे. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे हजारो मराठी कुटुंबांचे घराचं स्वप्न साकार होणार आहे. सदर बाब लक्षात घेता आम्ही ‘सिडको'कडे मनसे आणि सिडको सोडतधारक यांच्या वतीने विनंती केली आहे. ८ ते १० दिवसांनी सगळ्या सिडको सोडतधारकांना जे वाटपपत्र (ींत्त्दूसहू थूूी) देण्यात येईल, ते (किमान ५० ते १०० प्रतिनिधिक स्वरुपात) राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात यावे, अशी मागणी ‘मनसे'तर्फे करण्यात आली आहे.
‘मनसे'च्या सदर पत्रकार परिषद प्रसंगी शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यासोबत उपशहरअध्यक्ष सविनय म्हात्रे, सचिव सचिन कदम, विलास घोणे, सहसचिव दिनेश पाटील, चित्रपट सेना उपाध्यक्ष श्रीकांत माने, महिला सेना शहर अध्यक्षा डॉ. आरती धुमाळ, बेलापूर विभाग अध्यक्ष भूषण कोळी, रस्ते आस्थापना शहर अध्यक्ष संदीप गलुगडे, रोजगार विभाग शहरअध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना शहर संघटक अनिकेत पाटील, अक्षय भोसले, सुहास मिंडे, श्याम ढमाले, गणेश भवर, महिला सेना शहर सहसचिव सायली कांबळे आणि मोठ्या प्रमाणात सोडतधारक उपस्थित होते.
सिडको सोडतधारकांसाठी सदर क्षण त्यांच्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण आहे. सिडको सोडतधारकांनी या विषया संदर्भात राज ठाकरे यांना भेटण्याची विनंती केली असता ते काही दिवसात नवी मुंबईत येणार, असे सांगितले आहे. त्यामुळे सोडतधारकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज ठाकरे नवी मुंबईत आल्यावर सोडतधारक राज साहेब ठाकरे यांचा भव्य नागरी सत्कार करणार आहेत. - गजानन काळे, शहर अध्यक्ष - मनसे, नवी मुंबई.
‘मनसे'ने सिडकोकडे अतिरिक्त मागण्या...
७,८४९ सिडको सोडतधारकांपैकी १३०० सोडत धारकांनी ‘सिडको'ने सुरुवातीला ठेवलेली ३५ लाख किंमत परवडत नसल्याने घर ‘सिडको'ला परत केले होते. आता घरांच्या किंमती २७ लाख इतक्या कमी झाल्या आहेत. तरी सदर १३०० सोडतधारकांना संधी देण्यात यावी आणि त्यांना घरापासून वंचित ठेवू नये.
सिडको मधील अधिकाऱ्यांशी संगनमत असणारे काही दलाल, एजंट घर परत केलेल्या १३०० कुटुंबांना फोन करुन २ ते २.५ लाख द्या, तुम्हाला घर मिळवून देतो, अशी मागणी करत आहेत. यापुढे जर सोडतधारकांना असे फोन गेले, तर दलालांना चोपून काढू. तसेच या दलालांच्या आड असणाऱ्या सिडको अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालकांनी चौकशी करावी. शिवाय या योजनेतील उर्वरित १६८० घरांसाठी सुध्दा सोडत काढताना पंतप्रधान आवास योजना मध्येच ती घरे सर्वसामान्यांना २७ लाख रुपये याच दरात द्यावीत.
बामणडोंगरी येथे घरे बनून तयार आहेत. परंतु, सोडतधारकांना घरे अजुन बघायला मिळाले नाहीत. त्याची सोय सुध्दा ‘सिडको'ने लवकरात लवकर करुन सर्वसामान्य सोडतधारक कुटुंबांना आपले हक्काचे घर पाहण्याची सोय करावी.