‘एसएससी बोर्ड'च्या धर्तीवरील एसएससी सराव परीक्षेला प्रांरभ

नवी मुंबई : ‘श्री गणेशजी नाईक चॅरिटेबल ट्रस्ट'च्या वतीने १९९८ पासून दरवर्षी सातत्याने आयोजित होणाऱ्या ‘एसएससी बोर्ड'च्या धर्तीवरील रौप्य महोत्सवी एसएससी सराव परीक्षेचा शुभारंभ ६ जानेवारी रोजी झाला. नेरुळ, सेवटर-२२ मधीलम तेरणा डेंटल कॉलेजच्या ऑडीटोरियम येथे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या पस्थितीमध्ये  पार पडलेल्या या सराव परीक्षा शुभारंभ प्रसंगी आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ‘ट्रस्ट'चे अध्यक्ष संजीव नाईक, सचिव तथा नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, विशेष अतिथी म्हणून शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नात जयश्री चौगुले, भाभा अणुाक्ती केंद्रातील निवृत्त ज्येष्ठ वैज्ञानिक अनंत चौगुले, आदि उपस्थित होते. 

दरम्यान, मागील २५ वर्षात दीड लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेचा लाभ घेत विविध क्षेत्रांमध्ये यश प्राप्त केले आहे. दरवर्षी वाढता प्रतिसाद या परीक्षेला मिळतो आहे. 

‘एसएससी बोर्ड'प्रमाणे एसएससी सराव परीक्षा घेतली जाते. या परीक्षेमधून विद्यार्थ्यांना आपल्या उणिवा समजतात  आणि मुख्य परीक्षेपूर्वी विद्यार्थी त्या ते दूर करतात. यावर्षी ८५ शाळांमधील एकूण ९९०० विद्यार्थी सराव परीक्षेला बसले आहेत. २६ केंद्रांवर मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमधून सराव परीक्षा घेतली जाणार आहे. 

यावेळी आ. गणेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सराव परीक्षेने आत्मविश्वास निर्माण केल्याचे सांगितले. परीक्षेत यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा; परंतु दुर्दैवाने अपयश आल्यास अनुचित निर्णय घेऊ नका. तणावमुक्त वातावरणामध्ये परीक्षा द्या. हसत खेळत शिक्षण घेऊन मिळालेल्या ज्ञानाचा आपले जीवन समृध्द करण्यासाठी वापर करावा. पालकांनी देखील  आपल्या अपेक्षांचे ओझे विद्यार्थ्यांवर न लादता   त्यांच्या आवडीनुसार करिअर घडवू द्यावे, असे आवाहन करुन त्यांनी विद्यार्थ्यांना सराव परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. 

ज्येष्ठ वैज्ञानिक आनंद चौगुले यांनी जीवनामध्ये उपयोगी पडेल असे ज्ञान मिळवा आणि आपली बुध्दीमत्ता योग्य क्षेत्रामध्ये वापरा, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.  २००४ मध्ये सदर एसएससीसराव परीक्षा दिलेले नवी मुंबई महापालिकेचे डॉ. प्रशांत राठोड यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्य परीक्षेमध्ये चांगले यश मिळवण्यासाठी सराव परीक्षेचा उपयोग झाल्याचे सांगितले. 

दरम्यान, ६ ते २१ जानेवारी या कालावधीमध्ये सराव परीक्षा होणार आहे. या परीक्षेतील उत्तरपत्रिकांची तज्ञ शिक्षकांमार्फत तपासणी केल्यानंतर तात्काळ परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

नवी मुंबईकर विद्यार्थ्यांमधील कौशल्याला इनोव्हेटिव्ह प्रोगाम ट्रेनींग द्वारे मुक्त वाव