कल्याण सह परिसरातील महापालिका, नगरपालिकांसाठी एकत्रित परिवहन सेवा

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर शहर महापालिका, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ नगरपरिषद आणि कुळगांव-बदलापूर नगरपरिषद या क्षेत्रांची एकत्रित परिवहन सेवा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना रेल्वे व्यतिरिवत आणखी एक सक्षम सार्वजनिक वाहतूक पर्याय उपलब्ध करुन देत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुंबई महानगर कल्याण-डोंबिवली महापालिका परिक्षेत्राच्या नजिकच्या भिवंडी-निजामपूर शहर महारपालिका, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ नगरपरिषद आणि कुळगांव-बदलापूर नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन सेवा उपक्रम पूर्ण क्षमतेने अस्तित्वात नाहीत. या क्षेत्रांमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमांमार्फत बससेवा सुरु करण्यात यावी, अशी मागणी  नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. एकत्रित परिवहन सेवा क्षेत्र २२५ चौरस किलोमीटर इतके मोठे असणाऱ्या या परिसराची लोकसंख्या सन २०११ जनगणनेनुसार एकूण ३३,४३,००० इतकी आहे. गेल्या १३ वर्षात या भागातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्या तुलनेत पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचा शासन भर देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सदर निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

भविष्यात एकत्रित परिवहन सेवेमुळे प्रवाशांना सुलभ आणि सहज वाहतूक सेवा रास्त दरात उपलब्ध होणार आहे. तसेच परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होणार असून यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षणावर शासनाचा भर आहे. या परिवहन सेवेत नवीन ईव्ही बसेस अंतर्भुत करण्यात येणार असल्याने शहरामधील हवा प्रदुषणाची पातळी नियंत्रित आणि कमी करणे शक्य होणार आहे. सदर परिवहन सेवेकरिता कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये शहाड येथे एकत्रित परिवहन उपक्रमाच्या प्रशासकीय कार्यालयासाठी परिवहन भवन बांधण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

एवढ्या विस्तृत परिसरासाठी एकत्रित परिवहन सेवेमुळे या भागातील विकासाला मोठी चालना मिळण्यास मदत होणार आहे. परिवहन सेवेतून नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सेवा मिळू शकेल, असा विश्वास आहे.  - ना. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तुर्भे येथील पदपथावर आंब्याच्या लाकडी पेट्यांचे अतिक्रमण