नैना क्षेत्रातील 74 अनधिकृत जाहिरात फलकांविरुद्ध सिडकोची कारवाई

नवी मुंबई : सिडको महामंडळातर्फे नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित (नैना) क्षेत्रातील 94 गावांमध्ये बेकायदेशीर व अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांवर (होर्डिंग्ज) धडक कारवाई करण्यास सुरूवात करण्यात आली असून 74 फलक काढून टाकण्यात आले आहेत. तसेच या कारवाईविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेल्या जाहिरात कंपन्यांच्या याचिका फेटाळून लावताना नैना क्षेत्रामध्ये जाहिरात फलक उभारण्यासाठी सिडकोची परवानगी घेण्याबाबतचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. 

सिडकोने यापूर्वी जाहीर सूचना प्रसिद्ध करून अनधिकृत जाहिरात फलक काढून टाकण्याचे आवाहन संबंधित फलकधारकांना केले होते. तसेच संबंधित फलकधारक/जाहिरात संस्था यांना अनधिकृत जाहिरात फलक काढून टाकण्याबाबत एमआरटीपी कायद्याच्या कलम 53(1) अंतर्गत नोटीसीही बजावण्यात आल्या होत्या.

सिडकोतर्फे पनवेल तालुक्यातील 92 व उरण तालुक्यातील 2 याप्रमाणे 94 गावांतील अधिसूचित क्षेत्रामध्ये नैना शहर विकसित करण्यात येत आहे. नैना क्षेत्राकरिता सिडको विशेष नियोजन प्राधिकरण आहे. नैना विकास नियंत्रण नियमावलीच्या विनियम 30 प्रमाणे नैना क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे जाहिरात फलक उभारण्यासाठी परवानगी देण्याचे अधिकार विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोच्या बांधकाम परवानगी विभाग, नैना यांना आहेत.

अनधिकृत जाहिरात फलक काढून टाकण्यासंदर्भातील जाहीर सूचना 24 मे 2024 रोजी वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध करण्यात येऊन अनधिकृत फलकधारकांना फलक काढून टाकण्यासाठी 24 तासांचा अवधी देण्यात आला होता. तसेच संबंधित फलकधारकांना सदर होर्डीग्ज काढून टाकण्यासाठी एमआरटीपी अंतर्गत नोटीसाही बजावण्यात आल्या होत्या. हा कालावधी उलटून गेल्यानंतर सिडकोतर्फे नैना क्षेत्रातील पळस्पे फाटा, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्ग, पनवेल माथेरान रोड येथे कारवाई करण्यात येऊन 74 अनधिकृत फलक काढून टाकण्यात आले.

सदर कारवाई टाळण्यासाठी संबंधित जाहिरात कंपन्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, उच्च न्यायालयातर्फे या कंपन्यांच्या याचिक फेटाळून लावण्यात आल्या. सदर कंपन्यांनी पुढील ४ आठवड्यांत अनधिकृत फलक काढून टाकण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले. या आदेशान्वये सदर फलक काढून टाकल्यानंतर त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र या जाहिरात कंपन्यांनी सिडकोला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच सिडेकोच्या नैना अधिसूचित क्षेत्रासाठी तयार करण्यात आलेल्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार नैना अधिसूचित क्षेत्रामध्ये नैना नियोजन विभागाची परवानगी घेऊन जाहिरात फलक उभारण्याची मुभा उच्च न्यायालयाने सदर याचिकाकर्त्यांना दिली आहे.

नैना अनधिकृत बांधकाम विभागाचे प्रमुख तथा मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्यासह अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक प्रशांत भांगरे, नियंत्रक दत्तात्रेय चौरे, सागर महिंद, वरिष्ठ आरेखक घनश्याम ठाकूर, भूमापक नवनाथ नरबट, विकास खडसे व मणिलाल सोनावणे यांनी सिडको सुरक्षारक्षक, पोलीसांच्या बंदोबस्तात अनधिकृत फलक काढून टाकण्याची कारवाई यशस्वीपणे पार पाडली. त्याचप्रमाणे यापुढेही नैना क्षेत्रातील अनधिकृत जाहिरात फलकांविरुद्ध कारवाई सुरूच राहणार असल्याचे सिडकोतर्फे स्पष्ट करण्यात येत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आंबा कोयी संकलन उपक्रमात २ दिवसात २५ हजारपेक्षा अधिक कोयींचे संकलन