मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
‘उरण'मध्ये धडाडणार उध्दव ठाकरे यांची तोफ
उरण : उरण तालुका ‘शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)'च्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाबरोबर उरण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या, त्यांचे निराकरण करण्यासाठी ४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास द्रोणागिरी नोड (नवीन शेवा) येथील मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘जनसंवाद मेळावा'चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित जनसमुदायाला, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उध्दव ठाकरे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती ‘शिवसेना'चे (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांनी दिली आहे.
केंद्रात आणि राज्यात भाजपा मित्र पक्षाचे सरकार असताना मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत उरण परिसरातील जनतेला अनेक नागरी सुविधांनी ग्रासले आहे. त्यात काही अंशी रस्त्याचा विकास होत आहे. मात्र, आजही उरण शहरवासियांचा ‘सेपटी झोन'चा प्रश्न केंद्र सरकार दरबारी प्रलंबित आहे. सिडको, जेएनपीटी बाधित प्रकल्पग्रस्तांचा रेंगाळत पडलेला १२.५ % चा प्रलंबित प्रश्न, आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा १०० खाटांच्या रुग्णालयाचा रेंगाळलेला प्रश्न, भविष्यात उरणकरांवर उद्भवणारे पाण्याचे संकट अशा विविध विषयांवर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ४ मार्च रोजी ‘शिवसेना'च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘जनसंवाद मेळावा'द्वारे उरणकरांशी संवाद साधणार असल्याचे माजी आमदार मनोहर भोईर यांनी २ मार्च रोजी उरण येथे आयोजित ‘पत्रकार परिषद'मध्ये सांगितले.
विमानतळ, अटल सेतू याद्वारे शासन ‘सिडको'च्या माध्यमातून उरण विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना उध्दवस्त करणारे ‘नैना'सारखे इतर प्रकल्प लादून कवडीमोल भावाने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी पुढाकार घेत असेल तर अशा प्रकल्पांना शिवसेना (ठाकरे गट) आजही कडाडून विरोध करणार असल्याचे मनोहर भोईर म्हणाले. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘महाविकास आघाडी'च्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना संघटक मावळ तथा पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर संजोग भिकू वाघेरे-पाटील लोकसभा निवडणूक लढवणार आहे. त्याअनुषंगाने वाघ्ोरे-पाटील यांच्या पनवेल येथील कार्यालयाचा शुभारंभ देखील माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.३० च्या सुमारास द्रोणागिरी नोड येथील ‘जनसंवाद मेळावा'च्या माध्यमातून उध्दव ठाकरे उरणकरांशी संवाद साधणार आहेत, असे भोईर यांनी सांगितले.
‘जनसंवाद मेळावा'प्रसंगी शिवसेना नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, आमदार सचिन अहिर, संजोग वाघेरे-पाटील, बबनदादा पाटील यांच्यासह ‘शेकाप'चे ज्येष्ठ नेते तथा आमदार जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, ‘काँग्रेस'चे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, आर. सी. घरत, ‘राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)'चे प्रदेश पदाधिकारी प्रशांत पाटील, आदि ‘महाविकास आघाडी'मधील इतर पदाधिकारी-नेते उपस्थित राहणार असल्याचे माजी आमदार मनोहर भोईर यांनी ‘पत्रकार परिषद'मध्ये सांगितले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर, तालुका संपर्क प्रमुख दिपक भोईर, काशिनाथ कांबळे, राजेंद्र कडू आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.