मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
वाहतुक नियमांच्या जनजागृतीसाठी कोपरखैरणे वाहतूक पोलिसांकडून नाविन्यपुर्ण उपक्रम
नवी मुंबई : रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत कोपरखैरणे वाहतूक शाखेने नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी गत महिन्याभरात अनेक नाविन्यपुर्ण कार्यक्रम राबविले आहेत. यात प्रामुख्याने कोपरखैरणे भागातील शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये विशेष प्रबोधन करण्यात आले. त्याशिवाय रिक्षा चालक मालक संघटना, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालक यांच्यामध्ये जनजागृती केली. त्याचप्रमाणे पथनाटय, डिस्प्ले व्हॅन अशा वेगवेगळ्या माध्यमातून देखील जनजागृती केली. तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाई करुन त्यांचे देखील प्रबोधन केले आहे.
नागरिकांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी कोपरखैरणे वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे व त्यांच्या अंमलदारांकडुन वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच वाहतुक पोलिसांनी पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे हद्दीतील शाळा कॉलेज मधील विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम समजावून सांगताना वाहतुक नियमांबाबत चित्रफिती दाखवून वाहतूकीचे नियम पाळल्यास आपण स्वत व इतरांना कसे सुरक्षित ठेऊ शकतो याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांमार्फत गर्दीच्या ठिकाणी पथनाटये सादर करुन वाहतुक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली.
त्याचप्रमाणे त्यांच्या पालकांना देखील वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत आवाहन करुन वाहतुकीचे नियम न पाळल्यास होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देण्यात आली. वाहतुक पोलिसांनी कोपरखैरणे वाहतुक शाखेच्या हद्दीतील रिक्षा युनियन, चालक-मालक संघटनांचा देखील रिक्षा थांब्यावर जाऊन त्यांच्या बैठका घेण्यात आल्या. तसेच सध्या वाढत्या प्रदूषणामुळे वाहनांची पीयूसी काढून घेण्याबाबत वाहन चालकांमध्ये प्रबोधन करण्यात आले. प्रत्येक चौकातील सिग्नलवर पोलीस अंमलदारांकडुन वाहतूक नियमन करण्यासोबतच वाहतुकीच्या नियमांची जनजागृती करण्यात आली.
कोपरखैरणे वाहतुक पोलिसांनी कोपरखैरणे, घणसोली भागातील मुख्य बाजारपेठा, रेल्वेस्थानक येथे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येऊन जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे वाहतुक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी डिसफ्ले व्हॅनचा देखील वापर करण्यात आला. तसेच हेल्मेट परिधान करणे, सिट बेल्ट लावणे, इतर वाहतुकीच्या नियमांबाबत असलेले बॅनर, स्टीकर, पोस्टर विविध भागात वाटप करुन देखील जनजागृती करण्यात आली आहे. या उपक्रमांना जनतेमधुन चांगला प्रतिसाद मिळाला.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत महिनाभर जनजागृती करण्याबरोबरच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱया 2750 वाहनांवर कोपरखैरणे वाहतुक शाखेने कारवाई केली आहे. तसेच त्यांना 16 लाख 92 हजार 700 इतका दंड ठोठावला आहे. या कारवाईत विशेष म्हणजे रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱया चालकांवर कोर्ट केस करण्यात आले आहेत. तसेच मद्य पिऊन वाहन चालवणा-यांवर देखील मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच चालू महिन्यात दोन लाख पंधरा हजार इतका दंड देखील वसूल करण्यात आला आहे.