नवी मुंबई शहरात ‘अनधिकृत मोबाईल टॉवर'चे पेव

वाशी : एकविसाव्या सुनियोजित नवी मुंबई शहरात बेसुमार अनधिकृत मोबाईल  टॉवरचे पेव फुटले आहे. मात्र, नवी मुंबई महापालिका अधिकारी ‘अनधिकृत मोबाईल टॉवर'कडे दुर्लक्ष करीत आले आहेत. त्यामुळे नवी मुंबई शहरातील ‘अनधिकृत मोबाईल टॉवर'ची चौकशी करुन ‘बेकायदा मोबाईल टॉवर'वर कारवाई करावी, अशी मागणी ‘समता सहकार्य सामाजिक संस्था'चे संस्थापक ॲड. चंद्रकांत निकम यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे.

राज्यात एखादी दुर्घटना घडल्यावर शासन चौकशीचे आदेश देते. त्यानंतर स्थानिक प्रशासन  घडलेल्या घटनेनुसार स्वतःच्या हद्दीतील अवैध कामांची झाडाझडती घेऊन कारवाई करते. घाटकोपर मध्ये १३ मे रोजी जाहिरात फलक कोसळून १७ लोक मृत्युमुखी पडले. त्यानंतर या घटनेची चौकशी करुन राज्यातील सर्व अवैध जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या आदेशाची दखल घेऊन  नवी मुंबई महापालिका द्वारे नवी मुंबई शहरातील बेकायदा जाहिरात फलकांवर कारवाईचा बडगा उगारत ३४  फलकांवर कारवाई करण्यात आली.

दरम्यान, नवी मुंबई शहरात अनधिकृत जाहिरात फलकांचे पेव फुटल्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरात अनधिकृत ‘मोबाईल टॉवर'चे देखील पेव फुटले आहे. मात्र, अनधिकृत ‘मोबाईल टॉवर'कडे महापालिका अधिकारी सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे घाटकोपर मध्ये होर्डिग दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग आली त्याप्रमाणे ‘अनधिकृत मोबाईल टॉवर'मुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतरच  ‘अनधिकृत मोबाईल टॉवर'वर कारवाई केली जाईल का?, महापालिका प्रशासन एखाद्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का?, असा सवाल उपस्थित करत नवी मुंबई शहरातील अनधिकृत मोबाईल टॉवरवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ‘समता सहकार्य सामाजिक संस्था'चे संस्थापक ॲड.चंद्रकांत निकम यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 नवी मुंबई शहरातील इमारतींवर मोबाईल टॉवर लावण्यासाठी महापालिका नगररचना विभागामार्फत परवानगी दिली जाते. नविन सुधारीत शासन आदेशानुसार मोबाईल टॉवरवर कारवाई करण्याआधी शासनाला कळवणे गरजेचे आहे. त्यामुळे  नवी मुंबई शहरातील वैध,अवैध मोबाईल टॉवर असलेल्या इमारतींचे संरचना परीक्षण करण्यासाठी नोटीस बजावल्या आहेत. यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर दंडात्मक आणि तोडक यापैकी जी पात्र ठरेल अशी कारवाई करण्यात येणार आहे. - डॉ.राहुल गेठे, उपायुक्त (अतिक्रमण) - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे महापालिका क्षेत्रात स्वच्छता मोहीम; आयुवतांकडून पाहणी