गुन्हेगारी रोखण्यात नवी मुंबई पोलिसांना यश

नवी मुंबई : सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरामध्ये २०२३ या वर्षामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, मालमत्ता विषयक, फेटल अपघात, महिला अत्याचार यासारख्या गुन्ह्यात घट झाली असली तरी सायबर गुन्ह्यांचा आलेख चढताच राहिला आहे. मात्र, गतवर्षात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी एकही घटना घडली नाही. तसेच कुठल्याही प्रकारची जातीय धार्मिक तेढ निर्माण करणारी घटना घडली नसल्याचे ‘नवी मुंबई'चे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी वार्षिक ‘पत्रकार परिषद'मध्ये स्पष्ट केले.  
या वार्षिक ‘पत्रकार परिषद'प्रसंगी अपर पोलीस आयुक्त दिपक साकोरे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे, परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, परिमंडळ-२चे उपायुक्त पंकज डहाणे, मुख्यालय उपायुक्त संजयकुमार पाटील, वाहतूक विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे आणि इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.  

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०२३ मध्ये महिला विषयक दाखल झालेल्या एकूण ७०३ गुह्यापैकी ६८९ (९८ टक्के) गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. २०२२ च्या तुलनेत महिला विषयक गुन्हे ५९ ने कमी झाल्याचे दिसून येत आहे. २०२३ मध्ये बलात्काराचे एकूण २९९ गुन्हे दाखल झाले असून यातील सर्व गुन्हे उघडकीस आले आहेत. २०२२च्या तुलनेत २०२३ मधील बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये ४२ ने घट झाली आहे. तसेच २०२३ मध्ये अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या दाखल पोक्सोच्या एकूण १२३ गुन्ह्यातील सर्व गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.  

२०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये पोक्सोच्या गुन्ह्यांमध्ये ७ ने घट झाल्याचे आकडेवारीत दिसून येत आहे. २०२३ मध्ये विनयभंगाचे ३८५ गुन्हे घडले असून त्यापैकी ३७१ गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यात २०२२ च्या तुलनेत २२ ने घट झाल्याचे दिसून येत आहे. तसेच सासरकडील मंडळींकडून होणाऱ्या छळवणुकीच्या गुन्ह्यात घट झाल्याचे दिसून येत असले तरी महिलांची छळवणूक, हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त केल्यासंबंधीच्या गुन्ह्यात १४ ने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.  

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०२३ मध्ये शरीराविरुध्दच्या एकूण ८२५ दाखल गुन्ह्यांपैकी ८०७  (९८ टक्के) उघडकीस आले आहेत. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये शरीराविरुध्दच्या गुन्ह्यात ७५ ने घट झाली आहे. यात २०२३ मध्ये खुनाचे ३७ गुन्हे घडले असून त्यातील ३४ गुन्हे उघडकीस आले आहेत. २०२२ च्या तुलनेत खुनाच्या गुन्ह्यात २ ने घट झाली आहे. तर खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यात १० ने वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे दुखापतीच्या गुन्ह्यात तसेच गर्दीच्या गुन्ह्यात देखील घट झाली आहे.  

सन २०२३ मध्ये आर्थिक फसवणुकीचे ८१२ गुन्हे घडले असून त्यापैकी ४६२ गुन्हे उघडकीस आले आहेत. २०२२ च्या तुलनेत आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात १४९ ने वाढ झाली आहे. यात ठकबाजीचे ४४५ गुन्हे दाखल असून त्यातील ३६९ गुन्हे उघडकीस आले आहेत. विश्वासघाताचे ५६ गुन्हे दाखल असून त्यापैकी ५३ उघडकीस आले आहेत. २०२३ मध्ये पोलीस बतावणीच्या ८ घटना घडल्या असून या गुन्ह्यात २०२२ वर्षाच्या तुलनेत १२ ने घट झाल्याचे दिसून येत आहे.  

२०२३ मध्ये नवी मुंबईत मालमत्ताविषयक २३४ दाखल गुन्ह्यांपैकी ११७० (५० टक्के) गुन्हे उघडकीस आले आहेत. २०२२ च्या तुलनेत या वर्षामध्ये मालमत्ता विषयक गुन्ह्यांमध्ये ९९ ने घट झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. एकूण आकडेवारीवरुन नवी मुंबई पोलिसांची २०२२ वर्षाच्या तुलनेत २०२३ मध्ये गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणात ६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

सायबर गुन्ह्यात वाढ...
सन २०२२ या वर्षामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०७ सायबर गुन्हे (आयटी ॲक्ट) दाखल झाले होते, त्यापैकी फक्त ७२ गुन्हे उघडकीस आले होते. मात्र, २०२३ मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात सायबर पोलीस ठाणे सुरु झाल्यानंतर सायबर गुन्हे नोंद करण्याच्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे या वर्षात ४०३ सायबर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असून यात तब्बल ४७.८५ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, सायबर पोलिसांना यातील ७६ गुन्हे उघडकीस आणण्यात तसेच त्यातील ३३.८३ कोटींची रक्कम गोठविण्यात यश आले आहे. त्याशिवाय एनसीसीआरपी पोर्टलवर दाखल झालेल्या ७०९१ तक्रारीमध्ये देखील ६७.७८ कोटी रुपयांची फसवणूक झाली असून त्यातील ६.७८ कोटींची रक्कम गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका विभागनिहाय पार्कींग प्लॉट विकसीत करणार