कोरोना रुग्णांत वाढ, वाढवली चिंता

तज्ञ डॉक्टरांची ‘टास्क फोर्स' स्थापन; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यात कोरोनाने डोके वर काढल्याने सर्वांची चिंता वाढवली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा आता पुन्हा हळूहळू वाढू लागला आहे. कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्यामुळे राज्य शासन आणि आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून संभाव्य धोका लक्षात घेता सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी बघता आता राज्य सरकारने देखील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट फार जलद गतीने संक्रमित होणारा आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. राज्यात पुन्हा एकदा कोव्हीडची रुग्ण संख्या वाढत आहे. तसेच कोरोना विषाणूचा जेएन-१ या प्रकाराचे रुग्ण वाढत आहेत. अशा वाढत्या रुग्णाची संख्या लक्षात घेता या टास्क फोर्सची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. तसेच संभाव्य संकट लक्षात घेता त्यावर उपाययोजना करण्यासाठी राज्यात तज्ञ डॉक्टरांचे विशेष कार्यदलाची (टास्क फोर्स) पुनर्रचना करुन नवीन ‘टास्क फोर्स'ची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली.

‘टास्क फोर्स'मध्ये अध्यक्षस्थानी आयसीएमआर, दिल्लीचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर आहेत. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या कुलगुरु लेपट. जनरल डॉ. माधुरी कानीटकर, ‘वैद्यकीय शिक्षण-संशोधन संचालनालय'चे संचालक, बी. जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथील डॉ. सुरेश कार्यकर्ते, नवले मेडिकल कॉलेज पुणे येथील डॉ. वर्षा पोतदार, नवले मेडिकल कॉलेज, पुणे येथील (फिजिशियन) डॉ. डी. बी. कदम सदस्य आहेत, तर आयुक्त-आरोग्य सेवा सदस्य सचिव असणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

गंभीर आणि अतिगंभीर आजारी कोव्हीड-१९ रुग्णांसाठी रुग्ण व्यवस्थापन प्रोटोकॉल स्थापन करणे, कोव्हीड-१९ क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर आणि आरोग्य सेवा सहायक कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेची शिफारस करणे, गंभीरपणे आजारी कोव्हीढ-१९ रुग्णांवर उपचार करताना एकसमानता राखण्यासाठी योग्य औषध प्रोटोकॉलची शिफारस करणे, आदि कार्यवाही टास्क फोर्स करणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली.


सरकारचा आदेश...
कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्णसंख्येला नियंत्रणात आणण्यासाठी, तसेच त्यावर उपाय योजना करण्यासाठी १३ एप्रिल २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात तज्ञ डॉक्टरांचे विशेष कार्यदलाची (टास्क फोर्स) निर्मिती करण्यात आली होती. कोव्हीड बाधेची कारणमिमांसा, विश्लेषण आणि उपाययोजना करण्यास्तव तज्ञ डॉक्टरांचे विशेष कार्यदल (टास्क फोर्स) गठीत करण्यात आले होते. आता राज्यात पुन्हा एकदा कोव्हीड-१९ ची रुग्ण संख्या वाढत आहे. वाढत्या रुग्णाची संख्या लक्षात घेता ‘टास्क फोर्स'ची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. ‘टास्क फोर्स'ची पुनर्रचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे, असे राज्य शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

‘टास्क फोर्स'चे काम...
गंभीर आणि अतिगंभीर आजारी कोरोनाबाधित रुग्णांसाठी रुग्ण व्यवस्थापन प्रोटोकॉल स्थापन करणे.
कोव्हीड-१९ क्रिटीकल केअर हॉस्पीटल मध्ये तज्ञ डॉक्टर आणि आरोग्य सेवा सहायक कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेची शिफारस करणे.
गंभीरपणे आजारी कोव्हीड-१९ रुग्णांवर उपचार करताना एकसमानता राखण्यासाठी योग्य औषध प्रोटोकॉलची शिफारस करणे.
‘टास्क फोर्स'च्या अध्यक्षांनी ठरविल्याप्रमाणे इतर कोणतीही शिफारस.
‘टास्क फोर्स'ने केलेल्या शिफारशींचा अहवाल सदस्य सचिव यांनी शासनास वेळोवेळी कळविण्यात यावा. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ओवे डोंगराच्या पायथ्याशी उत्खनन ; महसूल विभागाचे दुर्लक्ष