मावळ, उरण जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनो, कामाला लागा

उरण : देशात हुकूमशाही, गुलामगिरी नको असेल तर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून ‘शिवसेना (ठाकरे गट) महाआघाडी'चे उमेदवार संजोग भिकू वाघेरे-पाटील आणि उरण विधानसभा मतदारसंघातून आमचे लढवय्ये सैनिक मनोहरशेठ भोईर यांना जनमानसांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मोठ्या मताधिववयाने निवडून द्या. त्यासाठी कार्यकर्त्यांनो कामाला लागा, असे आवाहन ‘शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)'चे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे.

उरण तालुका शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाबरोबर उरण विधानसभा मतदारसंघातील जनमाणसांच्या समस्या, त्यांचे निराकरण करण्यासाठी ४ मार्च रोजी द्रोणागिरी नोड (नवीन शेवा) येथील मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘जनसंवाद मेळावा'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायाला उध्दव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.

‘महाराष्ट्र'च्या मातीत मर्द जन्माला येतात गद्दार नाही. ‘शिवसेना'मधून ४० गद्दार गेले, ‘मावळ'चा गद्दार खासदार गेला. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने ‘शिवसेना'ला नवीन अंकुर फुलले असल्याचे मी ‘उरण'च्या लढवय्या भूमीत पाहत आहे. याचा निश्चित मला अभिमान वाटत आहे, असे उध्दव ठाकरे म्हणाले.

आज निवडणुकीच्या पहिल्या यादीत नितीन गडकरी यांच्यासारख्या नेत्यांचे नाव वगळून कृपाशंकर सिंग यांचे नाव पहिल्या यादीत येत आहे. भाजपा भ्रष्ट नेत्यांचा पक्ष झाला आहे. देशातील यंत्रणा गुलाम पण जनता गुलाम नाही ते जनता निवडणुकीमध्ये दाखविणार आहे. जर ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा झाला तर देशात जनता उद्रेक करेल, असे उध्दव ठाकरे यांनी निक्षुन सांगितले. आमच्या घराण्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या मोदी, अमित शहांनी लक्षात ठेवावे आणि देशातील तरुणांना अंमली पदार्थांच्या सेवनात घेऊन जाणारे अंमली पदार्थ गुजरात पोर्ट मधून येतातच कसे? याचा तपास गृहखात्याने करावा, असे ठाकरे म्हणाले.

दुसरीकडे उरण, मावळ लोकसभा मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने कामाला लागणे गरजेचे आहे असे सांगत उध्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून ‘मावळ'चे खासदार श्रीरंग बारणे आणि ‘उरण'चे आमदार महेश बालदी यांच्यावर खोचक टीका केली.

याप्रसंगी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, खासदार संजय राऊत, माजी मंत्री सचिन आहीर, ‘शेकाप'चे आमदार भाई जयंत पाटील, शिवसेना संघटक मावळ तथा ‘पिंपरी-चिंचवड'चे माजी महापौर संजोग भिकू वाघेरे-पाटील, जिल्हाप्रमुख  माजी आमदार मनोहरशेठ भोईर, ‘काँग्रेस'चे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत, ‘राष्ट्रवादी काँग्रेस (शरदश्चंद्र पवार) पार्टी'चे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, ज्योती ठाकरे, उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, भावना घाणेकर, माजी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, तालुका संघटक प्रमुख दिपक भोईर, रामदास घरत, बी. एन. डाकी, केसरीनाथ पाटील, कमलाकर पाटील यांच्यासह ‘शिवसेना आघाडी'चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजाराेंच्या संख्येने उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

राज्यात सध्या ‘कायदा-सुव्यवस्था'चे तीन तेरा -आदित्य ठाकरे