सिडको'मध्ये दि. बा. पाटील यांची जयंती साजरी
नवी मुंबई : सिडको महामंडळातील ‘सिडको प्रकल्पग्रस्त कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन'तर्फे नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांच्या ९८ व्या जयंती सोहळ्याचे २३ जानेवारी रोजी सिडको भवन येथे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, माजी आमदार बाळाराम पाटील, ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण क्रृती समिती'चे अध्यक्ष दशरथ पाटील, ‘जेएनपीए'चे माजी संचालक भूषण पाटील, ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले, महाव्यवस्थापक (कार्मिक) फैय्याज खान, ‘सिडको एम्प्लॉईज युनियन'चे अध्यक्ष विनोद पाटील, सरचिटणीस तथा ‘सिडको प्रकल्पग्रस्त कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन'चे अध्यक्ष जे. टी. पाटील, सदरचिटणीस प्रमोद पाटील यांच्यासह ‘सिडको'तील विभाग प्रमुख, अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दि. बा. पाटील यांनी नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांकरिता केलेल्या अतुलनीय कार्याच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांना मानवंदना देण्यासाठी दरवर्षी ‘सिडको प्रकल्पग्रस्त कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन'तर्फे दि. बा. पाटील यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात येते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘दिबां'च्या कार्यासंबंधीचा लघुपट दाखविण्यात आला. तद्नंतर मान्यवरांच्या शुभहस्ते ‘दिबां'च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
लोकनेते ‘दिबां'च्या विचारांतूनच आपल्याला काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे सांगत त्यांच्या आंदोलनाद्वारे अस्तित्वात आलेल्या साडेबारा टक्के योजनेमुळे नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या जीवनामध्ये समृध्दी आली असल्याचे मनोगत आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी व्यवत केले.
सह-व्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले यांनी आपल्या भाषणातून ‘दिबां'च्या विविध आंदोलनांचा उल्लेख करीत ‘दिबां'नी आपले संपूर्ण जीवन शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी वेचले असल्याचे मत व्यक्त केले.
‘सिडको एम्लॉईय युनियन'चे अध्यक्ष विनोद पाटील यांनी या प्रसंगी बोलताना ‘दिबां'नी नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याव्यतिरिक्त संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्येही मोलाचे योगदान दिल्याचे सांगितले.
तर ‘दिबां'च्या आंदोलनातून जन्माला आलेली साडेबारा टक्के भूखंड वाटप योजना राज्यात सर्वत्र आदर्श ठरल्याचे मत ‘प्रकल्पग्रस्त कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन'चे अध्यक्ष जे. टी. पाटील यांनी व्यक्त केले.
या सोहळ्यात स्थानिक प्रकल्पग्रस्तांकरिता भरीव कार्य केलेल्या माजी आमदार बाळाराम पाटील, ‘कृती समिती'चे अध्यक्ष दशरथ पाटील आणि कामगार नेते भूषण पाटील यांचा ‘असोसिएशन'च्या वतीने सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रमिला पाटील यांनी केले.