मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
बदलते पर्यावरण, समुद्रातील भरावाचा मीठ उत्पादनावर परिणाम
उरण : अखेरची घरघर लागलेल्या पारंपरिक मीठ उद्योगाला आता सातत्याने बदलणाऱ्या पर्यावरण आणि समुद्रातील वाढत्या मातीच्या भरावाचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मीठ तयार होण्यासाठी आता कालावधी वाढून १५ ऐवजी ३० दिवसांवर पोहोचला आहे. परिणामी, मीठ उत्पादकांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवर मिठागरे मोठा व्यवसाय होता. मात्र, जिल्ह्यातील वाढत्या औद्योगिक क्षेत्रामुळे मीठ व्ययसाय कमी होऊ लागला आहे. यामध्ये उरण तालुका मीठ उत्पादक म्हणून अग्रेसर ठिकाण होते. येथून रेल्वेच्या माल गाडीने मीठाची वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात होती. उरण मध्ये मिठागर कामगार आणि मालक यांची संख्या अधिक आहे. मात्र, ‘सिडको'च्या माध्यमातून येथील खाडीकिनाऱ्यावरील शेतजमिनी बरोबरच मिठागरांच्या जमिनीही संपादीत करण्यात आल्या आहेत. या जमिनीवर उद्योग, रस्ते, निवासी इमारती आणि नागरी सुविधा यासाठी मातीचा भराव सुरु आहे. त्याअनुषंगाने शेतीसह मिठागरे देखील बुजविली आहेत.
याही स्थितीत उरण परिसरात पारंपरिक मीठ उत्पादन करणारी मिठागरे सुरु असून मीठ उत्पादन केले जाते. मीठ तयार करण्यासाठी लागणारे समुद्राचे पाणी भरतीच्या वेळी साठवणूक तलावात घ्यावे लागते. मात्र, मातीच्या भरावामुळे आणि सततच्या बदलत्या वातावरण आणि पर्यावरणावर होणारा परिणाम यामुळे मिठासाठी लागणारे पाणी मिळत नसल्याचे मत मीठ उत्पादक चंद्रकांत घरत यांनी सांगितले. तसेच मीठ उत्पादनासाठी लागणाऱ्या पाण्याच्या क्षाराचे प्रमाण आणि तापमान याचा मेळ होत नसल्याने मीठ उत्पादनासाठीच्या कालावधीत वाढ झाली आहे. त्यामुळे मीठ उत्पादकांचे नुकसान होऊ लागले आहे.