सार्वजनिक स्वच्छतेमध्ये बाधा आणणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा

ठाणे : ठाणे शहर दिवसागणिक स्वच्छतेची मानके पूर्ण करत आहे. यासाठी अनेक उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत आहे. पण, अजुनही काही नागरिक बेशिस्त वागतात. अनेकदा  महापालिका कर्मचारी सकाळी कचरा नेण्यासाठी घरी जातात तेव्हा दार उघडत नाहीत आणि त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जातो. अशा नागरिकांना शिस्त लावण्यासाठी महापालिकेने कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे.

आपले ठाणे शहर सर्वांगाने बदलत असून स्वच्छतेत देखील आपले शहर सर्वोच्च स्थानी राहिल यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करीत आहोत, असा विश्वासही सफाई कर्मचाऱ्यांनी आयुक्तांना दिला.

सफाई कर्मचारी आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जबाबदार आहेत. मात्र, त्याचवेळी ‘ठाणे शहर'चे नागरिक म्हणून शहराप्रती त्यांच्या काही अपेक्षा आणि त्यांची काही मते देखील असू शकतात. सदर सर्व जाणून घेण्यासाठी  आयुक्त अभिजीत बांगर यांनी सुरु केलेल्या ‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे' या उपक्रमाचे पाचवे सत्र १ फेब्रुवारी रोजी ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसमवेत पार पडले. यात शहराच्या विविध भागात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

या पाचव्या चर्चासत्रात  वैशाली जाधव, कांताबाई सोनकांबळे, शिवानी बिडवई, अश्विनी पवार, सीता राठोड, सारिका मेस्त्री, संगिता अडसुळे, कांचन चिखले, जितेश प्रकाश पोतदार, सत्यविजय कांबळी, दत्तात्रय वनमाळी, संजय बोंढारे, जितेश वागले, मनोज दाभोळकर, सागर पाटील, आदि सफाई कर्मचारी उपस्थित होते.

ठाणे शहर बदलते आहे. शहरातील सर्वच भागात सफाई कर्मचारी स्वच्छता करीत असतात. परंतु, काही नागरिक सफाई झाल्यावर पुन्हा रस्ते, गटार, नाले आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतात. त्यांच्यावर महापालिकेने दंड आकारुन त्यांना रितसर पावती दिल्यास नागरिक रस्त्यावर कचरा टाकणे निश्चितच बंद करतील. तसेच प्रत्येक ठिकाणी दंडात्मक कारवाईचे फलक लावावेत, अशी सूचना महिला सफाई कर्मचारी संगिता अडसुळे यांनी केली. तसेच शहरात विविध ठिकाणी उभ्या राहणाऱ्या घंटागाड्यांना वेळ वाढवून द्यावा. त्याचप्रमाणे शहरातील विविध ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकण्यासाठी स्टीलच्या दोन टाक्या लावण्यात आल्या आहेत, तेथे मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्यामुळे त्या तुडुंब भरल्यानंतर परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे सदर टाक्यांमध्ये हलक्या स्वरुपातील कचऱ्याव्यतिरिक्त अन्य कचरा टाकला जाणार नाही यापासून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही यावेळी मांडण्यात आल्या.

सर्व्हिस रोडवरील गाड्या हटवाव्यात...
 शहरातील सर्व्हिस रोडवर अनेक ठिकाणी जुन्या गाड्या या कायमस्वरुपी उभ्या असतात. यामुळे या वाहनांखालचा कचरा काढणे शक्य होत नाही. तसेच गाड्या पार्किंग देखील केलेल्या असतात. सकाळी सफाई होत असल्यामुळे पार्किंग केलेल्या गाड्या उशिरा निघाल्यानंतर त्या गाड्यांखालील कचरा दिसून येतो. यासाठी पार्किंग एक दिवसाआड दोन्ही बाजुस करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. तसेच या उभ्या असलेल्या वाहनांखाली काही वेळेस मुके प्राणी मरुन पडलेले असतात. वाहनांखालील प्राणी तातडीने हलविणे शक्य नसल्याने सदर परिसरात दुर्गंधी पसरते. काही वेळेस सडलेल्या अवस्थेतील प्राणी सफाई कर्मचाऱ्यांनाच काढावे लागत असल्याने ती बाब आरोग्याच्या दृष्टीनेही घातक आहे. यासाठी रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केलेल्या वाहनांबाबत योग्य तो निर्णय होऊन याबाबत जनजागृती करावी, असा मुद्दा सफाई कर्मचाऱ्यांनी पोटतिडकीने मांडला.

शौचालयात पाण्याची उपलब्धतता असावी...
 शहरातील सार्वजनिक शौचालयाची स्वच्छतांची दुरावस्था गर्दुल्यांमुळे होत आहे. मद्यपी मद्यप्राशन करुन बाटल्या शौचालयात टाकतात. अनेकदा साफसफाई करताना बाटल्यांच्या काचा सफाई कर्मचाऱ्यांना लागतात. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच शौचालयाजवळ पाण्याच्या टाक्या तसेच नळाला पाणी असणे आवश्यक आहे. तरच सार्वजनिक शौचालये स्वच्छ राहतील, अशा अपेक्षा यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.

सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी स्कॉलरशीप-सुविधा...
मुलांच्या शिक्षणासंदर्भात आयुक्तांनी प्रश्न विचारला असता मुलांच्या शिक्षणाची फी परवडत नाही. त्यामुळे उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असली तर आर्थिकदृष्ट्या शक्य होत नसल्याचे त्यांनी नमूद केले. यावर महापालिका तसेच कंत्राटी पध्दतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी महापालिकेने स्कॉलरशीप योजना सुरु केलेली आहे. सदर स्कॉलरशीप अंतर्गत इयत्ता पहिली ते चौथी पर्यत प्राथमिक शिक्षणासाठी वार्षिक ४ हजार रुपये, पाचवी ते सातवी पर्यतच्या माध्यमिक शिक्षणासाठी वार्षिक ६ हजार रुपये, आठवी ते दहावी पर्यंतच्या उच्च माध्यमिक शिक्षणासाठी वार्षिक ८ हजार रुपये, ११ वी ते १२ वी विद्यालयीन शिक्षणसाठी वार्षिक ९,६०० रुपये तर १३ वी ते १५ वी पदवी पर्यंतच्या शिक्षणासाठी वार्षिक १२ हजार रुपये इतके अनुदान देण्यात येणार असून याबाबतचा निर्णय नुकताच झाला आहे. याबाबतची सविस्तर पोहोचविली जाईल, असेही आयुक्तांनी नमूद केले. सफाई कामगार म्हणून काम करताना वारस योजनेच्या माध्यमातून आपल्यापैकी पात्र कर्मचाऱ्यांची पाल्ये भविष्यामध्ये सफाई कामगार म्हणून काम करण्यासाठी पात्र ठरणार असली तरी मुलांच्या उच्च शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे आणि उच्च शिक्षणाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा तसेच या माध्यमातून वरिष्ठ स्तरावरील शासकीय आणि खाजगी नोकरी किंवा स्वयंउद्योग याकडेही भर देणे गरजेचे असल्याचे आयुक्त बांगर म्हणाले.

आयुक्तांचे मानले आभार...
 आपल्या शहराबद्दल सफाई कर्मचारी म्हणून नव्हेतर नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटते? काय बदल आवश्यक आहेत? कौटुंबिक परिस्थिती कशी आहे, मुले काय शिकतात किंबहुना मुलांना पुढे काय व्हावेसे वाटते याबद्दल आयुक्त अभिजीत बांगर यांनी कर्मचाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. तेव्हा उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांनी आपण आम्हाला आपल्यासमवेत चर्चेला बोलावून आमच्या समस्या ऐकून घेतल्या, त्याबद्दल आयुक्तांचे आभार मानले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

निसर्गरम्य आपटा रेल्वे स्थानकात सुविधांची वानवा