जलपर्णीमुळे उल्हास नदीतील पाणी प्रदूषित

ठाणे : कर्जत पासून उल्हास नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जात असल्याने कर्जत पासूनच उल्हास नदी प्रदूषित झाली आहे. दुसरीकडे जलपर्णीमुळे उल्हास नदीचे पाणी देखील प्रदूषित होत असून, जलपर्णीमुळे उल्हास नदी पात्रातील प्रदूषण वाढले आहे.

खंडाळा येथे बोरघाटात उगम पावलेल्या उल्हास नदीला जलपर्णीचा विळखा पडला आहे. नदीमध्ये  पाणी साठून राहिलेल्या  ठिकाणी जलपर्णीमुळे नदीच्या पाण्यावर हिरवी शेती केल्याचा चित्र दिसत आहे.  दरम्यान, जलपर्णीने उल्हास नदी मधील पाण्यावर हिरवा तवंग निर्माण झाला असून, परिणामी नदीच्या पाण्यातील जीवांना ऑक्सिजन मिळणे कठीण झाले आहे.

उल्हास नदीचे पाणी ठाणे जिल्ह्यात पिण्याचे पाणी म्हणून वापरात आणले जाणारे पाणी आहे. उल्हास नदीतील पाण्यामध्ये सांडपाणी वाहून जात असल्याने नदीचे पाणी सातत्याने प्रदूषित होत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून केला जात आहे. कर्जत पासून उल्हास नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जात असल्याने कर्जत पासूनच उल्हास नदी प्रदूषित झाली आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यापासून कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाण्यात हिरवेगार तवंग दिसून येत होते. आता तर ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीच्या पाण्यात हिरवे तवंग जाऊन पोहोचले असून, उल्हास नदीमध्ये बदलापूर शहरातील भागात मोठ्या प्रमाणात जलपर्णी उगवली आहे. या जलपर्णीबद्दल पर्यावरण प्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे. दुसरीकडे उल्हास नदीतील प्रदूषण थांबवावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने देऊनही स्थानिक प्रशासनाकडून उल्हास नदीतील प्रदूषण थांबविण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबद्दल देखील पर्यावरण प्रेमींकडून शंका उपस्थित केली जात आहे.

उल्हास नदीच्या पाण्यावर जलपर्णी उगवल्या असल्याने त्याचा पाण्याखाली असलेल्या जीवांना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. जलपर्णीमुळे पाण्यातील जीवांना ऑक्सिजन मिळणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे काही ठिकाणी तर नदीमधील मासे मरुन पाण्याबाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे उल्हास नदीच्या पाण्यावर निर्माण झालेल्या जलपर्णींना हटवण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.

दरम्यान, येत्या पावसाळ्यापूर्वी उल्हास नदीतील जलपर्णीबाबत प्रशासन आणि राज्याचे मुख्यमंत्री काही निर्णय घेणार काय, याकडे पर्यावरण प्रेमींचे लक्ष लागले आहे

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

एनआरआय क्षेत्रात ३ पलेमिंगो पक्षी मृत