डॉक्टरला हॉटेलमध्ये डांबून उकळली ३० लाखांची खंडणी
नवी मुंबई : नागपूर मध्ये राहणा-या हिमांशु राऊत (३४) या डॉक्टर कडून त्याच्या ओळखीतील राकेश पांडुरंग पुसदकर (३५) याने व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने २८.८३ लाख रुपये उकळल्याचे तसेच त्याला नेरुळ मधील हॉटेलमध्ये डांबून ठेवत त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या वडिलांकडून आणखी ३० लाख रुपये खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नेरुळ पोलिसांनी या प्रकरणी आरोपी राकेश पुसदकर याच्या विरोधात खंडणीसह जबरी लूट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार हिमांशु राऊत (३४) नागपूर मध्ये राहण्यास असून ते व्यवसायाने डॉक्टर आहेत. तर हिमांशु यांच्याकडून खंडणी उकळणारा आरोपी राकेश पांडुरंग पुसदकर (३५) देखील नागपूर मध्ये राहणारा आहे. २०२० मध्ये राकेश आपल्या आईला डॉ. हिमांशु राऊत यांच्या क्लिनीकमध्ये घेऊन गेला होता. त्यानंतर डॉ. राऊत यांची राकेश सोबत ओळख झाली होती. मार्च २०२३ मध्ये राकेश पुसदकर याने त्याचा पेपर, ज्वेलर आणि इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय असल्याचे तसेच सीबीडी-बेलापूर येथे मेघराज नावाचा बार असल्याचे सांगून त्याच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यास त्यांना चांगला फायदा मिळवून देण्याचे त्याने आमिष दाखवले होते.
त्यामुळे डॉ. राऊत यांनी राकेशवर विश्वास ठेवून व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यासाठी राकेशला २८.८३ लाख रुपये दिले होते. त्यानंतर राकेशने पैसे परत देण्याच्या बहाण्याने डॉ. राऊत यांना दोन वेळेस नागपूर येथून बेलापूर येथे बोलावून घेतले. तसेच त्यांना एका हॉटेलमध्ये थांबवून ठेवले. मात्र, त्यांना पैसे न देता उलट त्यांची होंडा ब्रिओ कार काही दिवस वापरण्याच्या बहाण्याने घेऊन त्यांना रिकाम्या हाती नागपूर येथे पाठवून दिले होते. त्यानंतर राकेशने जून २०२३ मध्ये पुन्हा डॉ. राऊत यांना सीबीडी-बेलापूर येथे बोलावून घेऊन त्यांना नेरुळ मधील व्हिला रेसिडेन्सी हॉटेलमध्ये थांबवून ठेवले. यावेळी डॉ. राऊत यांनी आपले पैसे आणि गाडीबाबत विचारणा केली असता राकेशने टाळाटाळ केली.
त्यावेळी डॉ. राऊत यांनी राकेशने हॉटेलच्या बाहेरुन आणलेले जेवण खाल्ले असता, त्यांना गुंगी आली. त्यानंतर राकेशने त्यांना हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच त्यांना जिवंत राहायचे असेल तर मागचे पैसे विसरुन जाण्यास सांगितले. तसेच त्याला आणखी ५० लाख रुपये देण्यास बजावले. तसेच पैसे न दिल्यास त्याला हॉटेलमध्येच मारुन टाकण्याची धमकी दिली. त्यावेळी घाबरलेल्या डॉक्टरने आपल्या वडिलांना फोन करण्यास सांगितल्यांनतर राकेशने त्याच्या वडिलांना फोन करुन डॉ. राऊत यांना ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे ५० लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर डॉ. राऊत बेशुध्द झाल्यानंतर राकेशने डॉ. राऊत यांचे दोन्ही मोबाईल फोन, दोन एअर गन, कपडे असलेली बॅग घेऊन पलायन केले.
त्यावेळी डॉ. राऊत दोन दिवस हॉटेलमध्ये बेशुध्दावस्थेत राहिल्याने यादरम्यान राकेशने डॉ. राऊत यांच्या वडिलांना धमकावून त्यांच्याकडून ३० लाख रुपये उकळले. दोन दिवसानंतर शुध्दीवर आलेल्या डॉ. राऊत यांनी रेल्वेने नागपूर येथील घर गाठून घडल्या प्रकाराची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर देखील राकेश डॉ. राऊत यांच्या वडिलांना फोन करुन डॉ. राऊत यांचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ त्याच्याकडे असल्याचे सांगून त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली. त्यावेळीही डॉ. राऊत आणि त्याच्या वडिलांनी राकेशला खंडणीची रक्कम दिली. या प्रकारानंतर घाबरलेले डॉ. राऊत मानसिक तणावाखाली गेले होते. त्यानंतर १४े फेब्रुवारी रोजी त्यांनी नेरुळ पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली.