प्रत्येक पोलीस अधिका-याने डायरी लिहावी - डी.शिवानंदन
पोलीस अधिकारी अनुभवसिद्ध असतात - डी.शिवानंदन
नवी मुंबई : पोलीस खात्यातील सेवेत लाभलेल्या अनुभवांचा आकृतीबंध असलेल्या पोलीस मन या अजित देशमुख लिखित पुस्तकाचे प्रकाशन रविवारी महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक शिवानंदन यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर पुस्तकाचे लेखक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अजित देशमुख, साहित्यिक लेखिका धनश्री लेले कवी प्रमोद जोशी व प्रकाशक नितीन हिरवे, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आणि पुस्तक प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र पोलीस खात्यात 35 वर्ष सेवा करुन राज्य गुफ्त वार्ता विभागातून अफ्पर पोलीस उपायुक्त पदावरुन निवृत्त झालेल्या अजित देशमुख यांच्या पोलीस सेवेतील अनुभवांवर आधारित या पुस्तकावर भाष्य करताना पोलीस अधिकारी कसे अनुभवसिद्ध असतात हे डी.शिवानंदन यांनी विषद केले. आपल्या भाषणात अजित देशमुख यांच्या लिखाणातील बारकाव्यांची त्यांनी प्रशंसा केली. पोलीस दलातील अन्य अधिकाऱयांनी देखील आपले सेवेतील अनुभव लिहून ते जनताभिमुख करावेत असे डी. शिवानंदन म्हणाले.
विचारप्रवृत्त आणि अंतर्मुख करणारं पोलीस मन
यावेळी पोलिस मन पुस्तकाची प्रस्तावना लिहिणाऱ्या प्रख्यात व्याख्यात्या धनश्री लेले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गुन्हा, गुन्हेगार, फिर्याद, शिक्षा, तुरुंग आदि मन गोठवणाऱ्या शुष्क वातावरणात पोलिसांची मनं वृक्ष कोरडी होत असतील असं आपल्याला जे वाटत होत, त्याला छेद देणारं अजित देशमुख यांचे हे पुस्तक असल्याचे त्या म्हणाल्या.
पोलीस सेवेत सेवा बजावताना आलेले अनुभव त्यांनी एखाद्या चित्रकाराच्या कौशल्याने रेखाटल्या आहेत. प्रत्यक्षात घडलेले प्रसंग अनुभवताना आपण कधी अचंबित होतो, तर कधी अस्वस्थ होतो. पोलीस दलातील अधिका-यांनी व कर्मचा-यांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक असून वाचकाला विचारप्रवृत्त आणि अंतर्मुख करणारं अजित देशमुख यांचे लेखन असल्याचे धनश्री लेले यांनी सांगितले.
यावेळी कवी प्रमोद जोशी यांनी आपल्या खास शैलीत, आदर्श पोलीस म्हणजे काय याचे उत्तम शब्दात विवेचन करुन अजित देशमुख यांनी लिहित राहावे असे सुचविले.
तर पुस्तकाचे लेखक अजित देशमुख यांनी आपल्या मनोगतात प्रत्यक्ष कर्तव्य बजावत असताना माणुसकीचा स्पर्श कसा महत्त्वाचा असतो हे नमूद करुन समाजाच्या विविध अंगांचे खोलवर दर्शन घेऊन पोलीस अधिकारी वास्तववादी कसा होत जातो याचे स्वानुभव सांगितले. आपलं पुस्तक हे पोलिसांच्या चातुर्य कथांवर आधारित नसून पोलिस सेवेत मनुष्य स्वभावाचे दर्शन वेगवेगळ्या प्रसंगात कसे दिसून आले त्याचा आकृतीबंध या पुस्तकात असल्याचे सांगितले.
दरम्यान, प्रत्यक्ष प्रकाशन होण्यापूर्वीच या पुस्तकाच्या सर्व प्रती संपून दुस-या आवृत्तीची घोषणा प्रकाशनाच्या दिवशीच होणे हे या पुस्तकाचे यश आणि वैशिष्ठ असल्याचे, प्रकाशक नितीन हिरवे यांनी नमूद केले.