बेलपाडा ते फॅशन टेक्नॉलॉजी कॉलेज रस्त्याचे काँक्रिटीकरणाकडे महापालिकेचे दुर्लक्ष
खारघर : बेलपाडा भुयारी मार्ग कडून फॅशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे पनवेल महापालिकाकडून काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन होवूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे येत्या पावसाळ्यात बेलपाडा ग्रामस्थ तसेच फॅशन टेक्नॉलॉजी, ए. सी. पाटील आणि येरळा आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दुर्गंधीयुक्त रस्त्यावरुन मार्गक्रमण लागणार आहे.
‘खारघर'चा प्रवेशद्वार असलेल्या तीन माकड ते उत्सव चौक, बेलपाडा भुयारी मार्गे निपट कॉलेज आणि बेलपाडा मेट्रो मार्ग ते सेक्टर-५ गणेश मंदिर आणि उत्सव चौक दरम्यानच्या रस्त्याचे पनवेल महापालिका कडून १०७ कोटी रुपये खर्च करुन सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार असून या कामाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते १४ फेब्रवारी २०२४ रोजी करण्यात आले होते. विशेष म्हणजे पावसाळ्यामध्ये बेलपाडा भुयारी मार्ग कडून फॅशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सांडपाणी वाहत असते. सांडपाण्यामुळे जवळपास रहिवासी आणि रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. महापालिका कडून सदर रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामापूर्वी सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचे काम करुन रस्ते काँक्रिटीकरण करण्यात येणार होते.
आता पुढील १५ दिवसात पावसाळा सुरु होणार आहे. असे असतानाही महापालिका कडून सदर रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला सुरुवात न झाल्यामुळे पावसाळ्यात बेलपाडा ग्रामस्थ तसेच फॅशन टेक्नॉलॉजी, ए. सी. पाटील आणि येरळा आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दुर्गंधीयुक्त रस्त्यावरुनच जावे लागणार आहे.
दरम्यान, या संदर्भात कार्यकारी अभियंता संजय कटेकर यांच्याशी संपर्क केला असता तो होवू शकला नाही.
खारघर, सेक्टर-३, ४ आणि ५ परिसरातील रहिवासी रेल्वेने प्रवास करताना सदर रस्त्याचा उपयोग करतात. विशेष म्हणजे सदर रस्त्यावरुन बेस्ट आणि एनएमएमटीच्या बसेस धावतात. बेलपाडा भुयारी मार्ग लगत बस थांबा असल्यामुळे खारघर आणि तळोजा परिसरातील प्रवासी बसच्या प्रतिक्षेत येथील बस थांब्यावर थांबतात. तसेच ए. सी. पाटील कॉलेज, येरळा आयुर्वेदिक-दंत महाविद्यालय, फॅशन टेवनॉलॉजी, सेक्टर-५मधील सरस्वती आदि महाविद्यालय मधील विद्याथी ये-जा करतात. त्यामुळे सदर रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी काँक्रिटीकरण करणे आवश्यक होते. मात्र, पनवेल महापालिका कडून दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत आहे.
खारघर येथून रेल्वेने प्रवास करताना तळोजा वसाहतीत जाण्यासाठी बेलपाडा येथील बस थांब्यावर रोज चढ-उतार करावे लागते. पावसाळ्यात रस्त्यावरुन वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे नाकावर रुमाल घेवून बस थांब्यावर बसच्या प्रतिक्षेत उभे रहावे लागते. - दिनेश कुलकर्णी, प्रवासी.
खारघर मधील सदरचा सर्वात जास्त वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावरुन महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी ये-जा करतात. शिवाय रस्त्याचा कडेला निवासी घरे आणि दुकाने आहेत. पावसाळ्यामध्ये सांडपाणी निचरा होत नसल्यामुळे रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने पावसाळ्यापूर्वी काम करावे.-संजय घरत, माजी सरपंच - बेलपाडा.