पनवेल तालुक्यातील १४ गावे दरडग्रस्त

पनवेल : पनवेल तालुवयातील १४ गावे दरडग्रस्त आहेत, असे पनवेल तालुका तहसीलदार विजय पाटील यांनी जाहीर केले आहे. पनवेल तालुक्याचा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्यात आला असून, या आराखड्यात १४ गावे दरडीच्या दहशतीखाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरडग्रस्त बावांमध्ये चिंचवाडी, धोदानी, सतीची वाडी, मालडुंगे या आदिवासी वाडींचा देखील समावेश आहे. अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागात होणाऱ्या भूस्खलनामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शवयता असल्याने दरडग्रस्त गावांतील नागरिकांनी पावसाळ्यात सतर्क राहावे, असे आवाहन तहसीलदार विजय पाटील यांनी केले आहे.

पावसाळ्यात भूस्खलनामुळे निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पनवेल तालुक्यात आपत्कालीन पथक स्थापन करण्यात आले आहे. पावसात अनेकदा आदिवासी वाड्यांचा संपर्क तुटतो. याशिवाय दरड कोसळण्याची भीती निर्माण होते. धोदानी येथील आदिवासी वाडीचा संपर्क पावसाळ्यात दरवर्षी तुटत असतो. आपत्ती व्यवस्थापन विभागाने पनवेल तालुक्यातील गावांना दरडीचा धोका असल्याची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये ओवळे, कर्नाळा, तळोजा, पनवेल ग्रामीण भागातील डोंगराच्या पायथ्याशी काही गावे आणि आदिवासी वाड्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त माडभुवन, डोलघर, आकुर्ली, केवाळे, नानोशी, जांभिवली, माचीप्रबळ, कुंडेवहाळ, तुळशीमाळ चावणे आदी गावांनाही दरड कोसळण्याचा धोका आहे.

पनवेल तालुक्यातील दरडग्रस्त गावे आणि आदिवासी वाड्या यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. दरडग्रस्त गावे आणि आदिवासी वाड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. पनवेल तालुका आपत्कालीन पथक देखील अतिवृष्टीमुळे भूस्खलन होणाऱ्या पनवेल तालुक्यातील सर्व घटनांवर बारकाईने लक्ष ठेवून तातडीने उपाययोजना करणार आहे. - विजय पाटील, तहसीलदार - पनवेल तालुका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापे हनुमाननगर भागाला पावसाळयात पुराचा धोका?