पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेसाठी नवी मुंबईतील वाहतूकीत बदल
नवी मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने बुधवार दि.15 मे रोजी सायंकाळी कल्याण पश्चिम येथील व्हरटैक्स मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रचार सभेच्या कालावधीत ठाणे शहर, कल्याण डोंबिवली परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नवी मुंबई वाहतुक विभागाने बुधवार दि.15 मे रोजी पहाटे 1 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत नवी मुंबईतून ठाणे शहर, कल्याण डोंबिवली भागात जाणा-या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना प्रवेश बंद केला आहे. या कालावधीत सदर वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. नवी मुंबई वाहतुक विभागाचे पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
या अधिसुचने नवी मुंबईतून महापे शिळफाटा मार्गे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना बुधवारी पहाटेपासून प्रवेश बंद करण्यात आला आहे. या कालावाधीत सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना ऐरोलीमार्गे इच्छित स्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. तसेच तळोजा येथील दहिसर मोरीमार्गे कल्याण फाटा येथून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना दहिसर मोरी मार्गे प्रवेश बंद करण्यात आलेला आहे.
सदर मार्गावरील सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना पनवेल मार्गे इच्छित स्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे. तसेच नवी मुंबई, शिळफाटा, खोणीकडून नेवाळी नाकामार्गे कल्याणकडे जाणा-या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना नेवाळी नाका येथे देखील प्रवेश बंद करण्यात आला असून सदर मार्गावरील वाहनांना नेवाळी नाका येथून अंबरनाथ, बदलापूर मार्गे इच्छित स्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, नवी मुंबईच्या हद्दीत सायन-पनवेल व ठाणे-बेलापूर या दोन्ही मार्गावर काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत. तसेच पुणे, कोकण गोवा बाजूकडून मुंबई मध्ये जाणा-या वाहनांचा ओघ मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नवी मुंबई वाहतूक विभागाच्या कार्यक्षेत्रातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहावे यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व प्रकारच्या जड अवजड मालवाहतुक करणा-या वाहनांना नवी मुंबईतून मार्गस्थ होण्यास व प्रवेश करण्यास तसेच वाहने उभी करण्यास पुर्णत: बंदी करण्यात आली आहे. मात्र ठाणे शहरातून मुलुंड-ऐरोली मार्गे नवी मुंबईमध्ये प्रवेश करणा-या वाहनांना वगळण्यात आले आहे.