धाराशिव भागात पत्नीची हत्या करुन फरार झालेल्या आरोपीला पनवेल मधुन अटक

नवी मुंबई : धाराशिव मधील भुम येथे पत्नीची हत्या करुन तिचा मृतदेह जाळून आपल्या प्रेयसीसोबत फरार झालेल्या आरोपीला पनवेल शहर पोलीस व भुम पोलिसांनी संयुक्त कारवाई करुन पनवेल मधुन अटक केली आहे. सुरज लहू तोरकड (20) असे या आरोपी पतीचे नाव असून पत्नीची हत्या करुन फरार झाल्यानंतर तो पनवेल भागात जेसीबीवर चालक महणून काम करुन पनवेल परीसरात आपले अस्तित्व लपवून राहत होता.

या प्रकरणातील आरोपी सुरज तोरकड हा मुळचा धाराशिव जिह्यातील भुम येथील असून त्याच्या मृत पत्नीचे नाव पुर्णीमा मनोहर पासलकर (18) असे आहे. सुरजचे एका अल्पवयीन तरुणीसोबत प्रेमसंबध निर्माण झाले होते. हि बाब त्याच्या पत्नीला समजल्याने तीने सुरजच्या विवाहबाह्य संबंधांना विरोध केला होता. त्यामुळे सुरजने पत्नी पुर्णीमा पासलकर हिचा गळा दाबुन हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पुर्णीमाच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून तिचा मृतदेह जाळून टाकला होता. त्यानंतर आरोपी सुरज याने मृत महिला ही त्याची अल्पवयीन प्रेयसी असल्याचे भासवण्यासाठी प्रेयसीची सुसाईड नोट सदर मृतदेहाजवळ टाकुन पलायन केले होते.  

या हत्येच्या घटनेनंतर भुम पोलिसांनी आरोपी सुरज लहू तोरकड व इतर आरोपीत विरोधात हत्या व पुराव नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला होता. आरोपी सुरज तोरकड हा पनवेल भागात राहत असल्याची माहिती भुम पोलिसांना मिळाली होती. याबाबतची माहिती पनवेल शहर पोलिसांना भुम पोलिसांनी दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, प्रविण भगत, पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोलीस हवालदार परेश म्हात्रे, पोलीस शिपाई प्रसाद परत, साईनाथ मोकळ आदींचे पथक तयार करण्यात आले.  

त्यानंतर पोलिसांनी तांत्रीक तपास व गुफ्त बातमीदाराचे आधारे आरोपीची माहिती प्राफ्त केली असता सदर आरोपी हा पवनेल मधील चिपळे गांव येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर चिपळगांवात येण्या जाण्याच्या रस्त्यावर पोलिसांचे दोन पथक तयार करुन सापळा लावण्यात आला. काही वेळानंतर आरोपी सुरज तोरकड हा संशयीत दुचाकीवरुन एका महिलेसह जाताना निदर्शनास आल्यानंतर सदर मोटार सायकलचा पाठलाग करुन आरोपी सुरजला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने त्याची पत्नी नामे पुर्णीमा हिची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर या आरोपीला भूम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

बांग्लादेशी नागरिकासह ४ गुन्हेगारांची धरपकड