थर्टीफस्ट, नववर्ष स्वागतः नवी मुंबई पोलीस अलर्ट

नागरिकांनी सुरक्षितपणे नववर्ष साजरा करण्याचे पोलिसांचे आवाहन  

नवी मुंबई : नववर्ष साजरा करीत असताना ‘थर्टीफस्ट'च्या रात्री शहरात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी नवी मुंबई पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांकडून शहरातील हॉटेल, बार, ऑर्केस्ट्रा बार, रेस्टॉरंट, परमिट रुम त्याचप्रमाणे खाजगी सोसायट्यांमध्ये, टेरेसवर होणाऱ्या न्यु इयर पाटर्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच मादक पदार्थाचे सेवन करणाऱ्यांवर, विनापरवाना मद्य-फॉरेन लिकर पिणाऱ्यांवर देखील कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत नवी मुंबई पोलिसांकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी २०२४ या नुतन वर्षाचे स्वागत करताना नियमांचे उल्लंघन न करता उत्साहाने आणि सुरक्षितपणे साजरा करावा, असे आवाहन ‘नवी मुंबई'चे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केले आहे. 

 नवी मुंबई पोलिसांकडून थर्टीफस्ट आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठया प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे अडीच हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी, त्याशिवाय वाहतूक विभागाचे अधिकारी-कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. यात ३ पोलीस उपायुवत, ६ सहाय्यक पोलीस आयुक्त, ५३ पोलीस निरीक्षक, १७६ सहाय्यक पोलीस निरीक्षक-पोलीस उपनिरीक्षक त्याचप्रमाणे १७०० पोलीस अंमलदारांचा समावेश आहे.  

त्याचप्रमाणे परिमंडळ स्तरावर आणि वाहतूक विभागाकडून शहराच्या प्रवेशद्वारावर, मुख्य चौकात, नाकाबंदी, पेट्रोलींग, फिक्स पाँईट तसेच निर्जन स्थळी चेकींगचे पॉईंट लावण्यात येणार आहेत. नवी मुंबईत परिमंडळ स्तरावर ठेवण्यात आलेल्या बंदोबस्तावर पोलीस उपायुक्त तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग स्तरावरुन देखरेख करणार आहेत. याशिवाय गुन्हे शाखेकडून विविध आस्थापनांवर तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर विशेष वॉच राहणार आहे. सागरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सागरी किनाऱ्यावर देखील पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे.  

राज्य शासनाने वाईन शॉप, बियर शॉप, देशी दारु दुकान यांना मध्यरात्री १ वाजेपर्यंत उघडे ठेवण्याची परवानगी दिली आहे. तर परमिट रुम, क्लब, बिअर बार यांना पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे बार, हॉटेल्स आणि इतर आस्थापनांकडून कुठल्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी ण्याच्या सूचना नवी मुंबई पोलिसांनी दिल्या आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.  

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पनवेल आणि आजुबाजुच्या परिसरात असलेल्या हॉटेल्स, रिसॉर्ट आणि फार्म हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात पाटर्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक नियमनासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. वाहतूक नियंत्रणासाठी ठिकठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात ठेवले जाणार आहेत. त्यामुळे पोलिसांची अतिउत्साही पर्यटकांवर, मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर करडी नजर असणार आहे.  

३१ डिसेंबर २०२३ रोजी मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या व्यक्ती, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे, महिलांची छेडछाड करणारे, अनधिकृत मद्य विक्री करणाऱ्या आस्थापना, रेव पार्टी, अंमली पदार्थाची विक्री करणारे त्याचप्रमाणे त्याचे सेवन करणारे अशा व्यक्तींविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी बेवारस वस्तू, संशयित व्यक्ती, संशयित वाहन, मुलींची छेड काढणारे, अफवा पसरविणारे आदिंची माहिती देण्यासाठी तसेच पोलीस मदतीसाठी ११२ या हेल्पलाईनवर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केले आहे.
 
शहरात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी, नागरिकांनी थर्टीफस्ट साजरा करताना सतर्क रहावे. त्याचप्रमाणे थर्टीफस्ट साजरा करणाऱ्यांनी मद्य प्राशन करुन वाहन चालवू नये. नागरिकांनी २०२४ या नुतन वर्षाचे स्वागत करताना इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घेऊन तसेच नियमांचे उल्लंघन न करता उत्साहाने आणि सुरक्षितपणे साजरा करण्याचे आवाहन देखील पोलीस आयुक्त भारंबे यांनी केले आहे.

वाहतूक पोलिसांकडून ‘ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह'ची विशेष मोहिम राबविण्यात येणार असून संशयित मद्यपी वाहन चालकाची सर्वप्रथम ब्रेथ ॲनालायझर्स द्वारे तपासणी करुन नंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यात दोषी आढळणाऱ्यांवर दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 सेक्स्टॉर्शन मधील आरोपी सायबर गुन्हेगारांच्या बालेकिल्ल्यात जेरबंद