वाशी मधील सार्वजनिक रस्त्यावर विकासकाची मक्तेदारी?

वाशी : वाशी सेक्टर-२ मध्ये एका खाजगी विकासकाने स्वतःची  मालवाहू अवजड वाहने आणि रेडीमिक्स वाहने उभी करण्यासाठी सार्वजनिक रस्त्याची अडवणूक केली आहे. मात्र, सदर विकासकाच्या या मक्तेदारीकडे वाहतुक पोलीस आणि नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी सपशेल दुर्लक्ष केल्याने सर्वसामान्य वाहन चालकांना या रस्त्यावर वाहन चालविताना अडचणी येत आहेत.

एखाद्या रस्त्यात खोदकाम किंवा इतर कामे करायची असतील तर तेथील वाहतुकीत बदल करण्यासाठी वाहतुक पोलीस विभागाचे रीतसर ना  हरकत प्रमाणपत्र घेतले जाते. सदर प्रमाणपत्र घेतल्यानंतर त्या रस्त्यावरील वाहन चालकांची  होणारी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी वाहतुक पोलीस नियंत्रण विभाग तर्फे प्रसिध्द पत्रक जाहीर करण्यात येते. मात्र,  या नियमावलीकडे दुर्लक्ष करुन वाशी सेक्टर-२ मधील एका  विकासकाने स्वतःच्या वाहनांसाठी मागील दीड ते दोन महिन्यांपासून आपली मालवाहू अवजड वाहने उभी करण्यासाठी रस्त्याची अडवणूक करुन ठेवली  आहे. तसेच या रस्त्यावर रेडीमिक्स सिमेंट काँक्रिट  भराव करणाऱ्या लहान मशीन देखील ठेवल्या आहेत. मात्र, सदर प्रकारांकडे ना वाहतुक पोलीस लक्ष देत, ना महापालिका अतिक्रमण विभाग अधिकारी. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहन चालविताना वाहन चालकांची मोठी गैरसोय होत आहे.
दरम्यान, याप्रकरणी ‘वाशी वाहतुक नियंत्रण शाखा'चे पोलीस निरीक्षक दिलीप गुजर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशीमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला