मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
तळोजा वसाहतीत डाकघर सुरु
खारघर : ‘भारतीय डाक विभाग'कडून तळोजा फेज-२ वसाहत मधील ‘सिडको'च्या मारवा गृहनिर्माण सोसायटीत १७ जानेवारी पासून डाकघर कार्यालय सुरु झाले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन ‘नवी मुंबई डाकघर विभाग'चे वरिष्ठ अधीक्षक मोहम्मद सईद यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ‘डाकघर विभाग'चे वरिष्ठ अधिकारी नितीन येवला, माजी नगरसेवक हरेश केणी, शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजीव सिन्हा, अंकुश गायकवाड, बबन केणी, इकबाल नावडेकर, गुलाम चरफेरे, हयात फातिमा, अफरोझ शेख, हेमराज म्हात्रे, संतोष भोईर, आदि उपस्थित होते.
तळोजा वसाहतीत डाकघर नसल्यामुळे नागरिकांना १०० ते १५० रुपये रिक्षाभाडे खर्च करुन ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या तळोजा औद्योगिक वसाहत अथवा खारघर येथे जावे लागत असे. तळोजा वसाहत साठी डाकघर सुरु व्हावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजीव सिन्हा यांनी गेल्या वर्षभरापासून मुंबई आणि नवी मुंबई डाकघर विभाग यांच्याकडे पत्रव्यवहार तसेच अधिकाऱ्यांना भेटून रहिवाशांची होणारी गैरसोय लक्षात आणून दिली होती. अखेर १७ जानेवारी पासून डाकघर सुरु झाल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.
दरम्यान, ‘सिडको'ने तळोजा फेज-२ मध्ये दुकान, गाळे नाममात्र दराने उपलब्ध करुन दिले आहे. सदर डाक कार्यालय पेंधर मेट्रो स्थानक पासून जवळ असल्यामुळे वसाहत आणि परिसरातील गावासाठी सोयीचे होणार आहे.
तळोजा वसाहतीत डाकघर सुरु झाल्यामुळे नागरिकांना औद्योगिक वसाहत, नावडे गांव आणि खारघर येथे जावे लागत असे. सदर कार्यालयामुळे नागरिकांची पायपीट थांबणार आहे. -राजीव सिन्हा, सामाजिक कार्यकर्ते.
१ लाख लोकसंख्या असलेल्या वसाहतीत स्वतंत्र डाकघर सुरु झाल्यामुळे समाधान वाटत आहे. - अंकुश गायकवाड, रहिवासी.
पत्रव्यवहारच्या कामासाठी खारघर येथे जावे लागत असे. आता घराजवळ कार्यालय सुरु झाल्यामुळे समाधान वाटत आहे. -कैलास सुपेकर, रहिवासी - धनश्री सोसायटी.
तळोजा येथील डाकघर कार्यालयात सध्या २ कर्मचारी उपलब्ध असून आधारकार्ड नोंदणी तसेच पोस्ट बचत खाते, स्पीड पोस्ट आदि सुविधा उपलब्ध असणार आहे.
-नितीन येवला, वरिष्ठ अधिकारी डाकघर विभाग, नवी मुंबई.
नोकरीसाठी पत्रव्यवहार करणाऱ्या बेरोजगार तरुणांना वेळेवर पत्र उपलब्ध होत नसे. तसेच पत्रव्यवहारसाठी खारघर अथवा तळोजा औद्योगिक वसाहत मधील कार्यालयात जावे लागत असे. ती समस्या दूर झाली आहे. -हरेश केणी, माजी नगरसेवक.