महावाचन उत्सवात 5 हजाराहून अधिक विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी अधोरेखित केले पुस्तकांचे महत्व
सीबीडी पोलीस ठाणे येथे ओपन जिम सुविधा
नवी मुंबई : पोलिसांना कामाच्या ठिकाणीच मिळालेल्या थोड्या वेळाचा सदुपयोग करुन स्वतःच्या आरोग्याची काळजी घेता यावी या उद्देशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सीबीडी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी ओपन जिम तसेच बॅडमिंटन कोर्ट सुरु केले आहे. सीबीडी पोलीस ठाण्याच्या आवारात सुुरु करण्यात आलेल्या ओपन जिम आणि बॅडमिंटन कोर्ट या उपक्रमाचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी कौतुक केले.
‘नवी मुंबई'चे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलीस आणि नागरिक यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम सुरु करुन आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण केला आहे. इएमसी (मध्यवर्ती मुद्देमाल कक्ष) असाच एक राज्याच्या पातळीवर पथदर्शक ठरणारा उपक्रम मार्च महिन्यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात सुरु करण्यात आला आहे. पूर्वी पोलीस ठाण्यामध्ये आणि पोलीस ठाण्याचया आवारांमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यातील जप्त केलेली अनेक वाहने धुळखात आणि कुजलेल्या अवस्थेत पडून राहत होती. त्यामुळे पोलीस ठाण्याचा परिसर डम्पिंग ग्राऊंड सारखा झाला होता. सदर सर्व वाहने पोलीस आयुक्तांनी सुरु केलेल्या ईएमसी या नवीन उपक्रमामुळे तळोजा येथे एकत्रित ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे सर्व पोलीस ठाणे परिसर आता मोकळा झाला आहे.
सीबीडी-बेलापूर पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये सुध्दा अनेक वर्षापासून बरीच वाहने धुळखात पडून होती. सदर वाहने इएमसी तळोजा येथे जमा केल्यानंतर पोलीस ठाणे आवारातील जागा रिकामी झाली. या रिकाम्या झालेल्या जागेचा सदुपयोग करावा या हेतुने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सीबीडी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी ओपन जिम सुरु केले आहे. सदर ओपन जिम साठी नवी मुंबई महापालिकेचे सहकार्य लाभले आहे. काही दिवसांपूर्वी गिरीधर गोरे यांनी पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी बॅडमिंटन कोर्ट बनवले आहे.
पोलिसांच्या २४ तास कर्तव्यामुळे त्यांच्या आरोग्याची हेळसांड होते. इच्छा असुनही पोलिसांना वेळेअभावी व्यायामाकडे वळणे कठीण होते. त्यातूनच पोलिसांमध्ये तणाव निर्माण होत आहे. सततच्या कामाच्या तणावांमध्ये पोलिसांचे मानसिक आरोग्याचाही प्रश्न उपस्थित होत आहे. अशावेळी पोलिसांना कामाच्या ठिकाणीच मिळालेल्या थोड्या वेळाचा सदुपयोग करुन स्वतःच्या आरोग्याची काळजी घेता यावी या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या ओपन जिम या संकल्पनेचे पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्या मधून स्वागत होत आहे. तसेच तणावमुक्त होण्यासाठी खेळ खेळणे उत्तम साधन असल्याने पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी सुरू करण्यात आलेले बॅडमिंटन कोर्ट मुळेही पोलिसांमधील तणाव कमी होण्यास मदत होत आहे.
सदर ओपन जिमचे उद्घाटन पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी सह-पोलीस आयुक्त संजय येनपुरे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, पोलीस उपायुवत तिरुपती काकडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल गायकवाड, योगेश गावडे यांच्यासह इतर अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.