मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
शाळेसाठी पारसिक टेकडीच्या तळावर घाव
नवी मुंबई : पारसिक टेकडीला पुन्हा एकदा धोका निर्माण झाला आहे. शाळेच्या भूखंडाच्या विकासाचा एक भाग म्हणून टेकडीच्या पायथा अवाढव्य मशिनद्वारे कापला जात असल्याची बाब पर्यावरणप्रेमींनी उघडकीस आणली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नॅटकनेक्ट फाऊंडेशन आणि पारसिक ग्रीन्स फोरम यांच्या वतीने ई-मेल द्वारे तक्रार करण्यात आली आहे. बेलापूर, सेक्टर-३०-३१ येथील पारसिक टेकडीची पूर्व बाजू धोकादायकपणे कापली जात असल्याची तक्रार पर्यावरणवाद्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
प्राप्त माहितीनुसार ‘सिडको'ने गोठिवली येथील श्री ज्ञानेश्वर माऊली संस्थेच्या शाळा प्रकल्पासाठी ४,१३९ चौरस मीटरचा क्षेत्रफळाचा भूखंड दिला आहे. मुळात आमचा शाळेला कोणताही आक्षेप नाही. परंतु, शाळेचा भूखंड पारसिक टेकडीच्या पायथ्याशी असून यंत्रांनी या टेकडीचा काही भाग कापण्यास सुरुवात झाल्याचे स्थानिक रहिवाशांनी केलेल्या छायाचित्रणावरुन दिसत असल्याचे ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले.
वास्तविक पाहता ‘सिडको'ने टेकडीचा कोणताही भाग कापल्यास पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत संवेदनशील असले पाहिजे, असे बी. एन. कुमार म्हणाले.
पारसिक टेकडीवर १०० हून अधिक इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. टेकडी कापली गेल्यास येथील सर्वच वास्तुंना धोका उत्पन्न होण्याची शक्यता आहे, असे मंचाचे आणखी एक सदस्य तथा ‘पारसिक हिल्स रहिवासी संघटना'चे अध्यक्ष जयंत ठाकूर यांनी सांगितले.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते सुधीर दाणी यांनीही सिडको डोंगराच्या सुरक्षेची काळजी घेत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे.
२०२२ च्या पावसाळ्यात पारसिक टेकडीवर दरड कोसळून पाणी पुरवठा देखरेख केंद्राचे नुकसान झाल्याचेही पर्यावरण कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे पारसिक टेकडीच्या इतक्या जवळ येणारे प्रकल्प सुरक्षित राहतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. - बी. एन. कुमार, संचालक-नॅटकनेवट फाऊंडेशन.
यापूर्वी सुशोभिकरणाच्या नावाखाली मधूनच पारसिक टेकडी कापण्यावर पर्यावरणप्रेमींनी आक्षेप घ्ोतला होता. ‘महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग'ने या प्रकरणाची स्वतःहुन दखल घेतली. त्यामुळे ‘सिडको'ला संबंधित बिल्डरवर कारवाई करावी लागली. तरीही, आता त्याच परिस्थितीची पुनरावृत्ती होत असून तीही अक्षरशः ‘सिडको'च्या नाकाखाली - विष्णू जोशी, पदाधिकारी - पारसिक ग्रीन्स.